

वर्धा : हिंगणघाट येथील प्राध्यापिका जळीतकांडच्या वेदना अजूनही मिटल्या नसताना पुन्हा एका अल्पवयीन मुलीला विकृताने एकतर्फी प्रेमातून जाळून मारण्याची धमकी देत तिचा विनयभंग केला. ही घटना शास्त्री वॉर्डातील उड्डाणपुलाखाली घडली असून, याप्रकरणी आरोपीविरुद्ध पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला, आरोपीच्या शोधार्थ पोलिस पथक रवाना देखील झाले असून, लवकरच आरोपीला अटक करण्यात येणार असल्याची माहिती हिंगणघाट पोलिसांनी दिली, १७ वर्षीय पीडिता अकरावीत शिक्षण घेते. राज नामक मुलाने तिला रस्त्यात अडवून तू मला आवडे माझे तुझ्यावर प्रेम आहे, असे म्हटले असता पीडितेने त्यास स्पष्ट नकार दिला होता.
आरोपी सतत पीडितेचा पाठलाग करून तिच्याशी असभ्य वर्तन करायचा. पीडितेने ही बाब तिच्या आई-वडिलांना देखील तसेच आरोपीच्या आई वडिलांना देखील सांगितली होती. घरच्यांनी देखील आरोपीला वारंवार समजावून सांगितले होते. अखेर पीडिता ही घरी एकटीच असताना आरोपी राज याने घरात अनधिकृतपणे प्रवेश करून मी तुझ्यावर प्रेम करतो, तू जर माझ्यावर प्रेम नाही केले तर मी तुला जाळून मारून टाकेल, अशी थेट धमकी दिली. पीडितेते आरडाओरड केली असता विकृताने तेथून पळ काढला. अखेर पीडितेने याबाबतची तक्रार हिंगणघाट पोलिसात दाखल केली, हिंगणघाट पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती दिली.