तरुणाच्या डोक्यावर केले तलवारीने वार! आरोपींना ठोकल्या बेड्या

वर्धा : मला कामावर का नेत नाही, असे म्हणत वाद करुन तरुणाच्या डोक्यावर आणि मानेवर तलवारीने सपासप वार करुन त्यास जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना गोंडप्लॉट परिसरात घडली. याप्रकरणी ७ रोजी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीस अटक केल्याची माहिती दिली. आनंद वसंत ठाकरे (३०) रा. सुदर्शन नगर पिपरी मेघे असे गंभीर जखमीचे नाव आहे. तर मंगेश टेकाम रा. गोंडप्लॉट आणि गणपत उईके रा. पंजाब कॉलनी असे अटक आरोपींची नावे आहेत.

आनंद वसंत ठाकरे हा उत्तम गलवा कंपनीत राखड भरलेले ट्रक रिकामे करण्याचे काम करतो. तो ६ रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास सायकलने गोंड प्लॉट परिसरात त्याच्यासोबत काम करणाऱ्या कामगाराकडे पैसे देण्यासाठी गेला होता. पैसे देऊन परत घराकडे जात असताना आरोपी मंगेश टेकाम याने आवाज देत तु मला कामावर का नेत नाही, असे म्हटले. दरम्यान आरोपी गणपत उईके हा देखील तेथे होता. गणपतने घरातून तलवार आणत मंगेशच्या हाती दिली. मंगेशने तलवारीने आनंदच्या डोक्यावर व मानेवर वार केले. आनंदने जीव वाचविण्याचा प्रयत्न करीत ते वार हाताने झेलले. त्यामुळे त्याच्या हाताला देखील गंभीर जखमा झाल्या. डोक्यावर व मानेवर तलवारीने वार करीत दोघांनी त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. जखमी आनंदला सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. पोलिसांना दिलेल्या बयाणात त्याने ही सर्व आपबिती सांगितली. पोलिसांनी बयाण नोंदवून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करीत अटक केल्याची माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here