

रामटेक : कृषी कर्जाचा वाढता भार. त्यातच नापिकी. यासोबतच विकलेल्या धानाचा चुकारा वेळेवर मिळत नसल्याने लग्नकार्य कसे होणार, या विवंचनेतून महादुला (ता. रामटेक) येथील तरुण शेतकरी रामेश्वर शिवचरण केळेकार (3०) याने मंगळवारी दुपारी होतात गळफास लावून आत्महत्या केली. रामेश्वर व त्याची आई असे दोघेच महादुला येथे राहत होते. २०१३ ला त्याच्या वडिलांचे निधन झाले. कुटुंबाला रामेश्वर याचाच आधार होता. त्याचे नुकतेच लग्नही जुळले होते. ते याच महिन्यात होते.
यावर्षी कापसाचे पीक हातचे गेले. धानाचेही उत्पादन कमी झाले. महिनाभरापूर्वी त्याने धान आदिवासी विकास महामंडळाला विकला होता. त्याचा ५० हजार रुपयाचा चुकारा मिळाला नसल्याने तो चिंतित होता. त्याच्यावर युनियन बँकेचे १.५० लाख रुपयांचे कर्ज होते. बचत गटाचेही 3० हजार कर्ज होते. कर्जांचा वाढता भार आणि नापिकीमुळे रामेश्वर सतत चिंतित असायचा. यासोबतच लग्नाचा खर्च कसा करावा, असाही प्रश्न त्याला पडला होता. या विवंचनेत मंगळवारी त्याने शेतातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. याबाबत माहिती त्याच्या आईला कळताच ती बेशुद्ध पडली. तिच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. रामेश्वरला तीन बहिणी व एक भाऊ आहे. बहिणींचे लग्न झाले आहे तर भाऊ कोहळी ता. कळमेश्वर येथे मजुरी काम करतो. रामटेक पोलिसांनी या प्रकरणाची नोंद करीत तपास सुरू केला आहे.