मिनी मंत्रालय होणार मोठे! गट पाचने, तर गण दहाने वाढणार; तीन तालुके ‘जैसे थेच: पाच तालुक्‍यांमध्ये प्रत्येकी एक सर्कल वाढणार

वर्धा : राज्य सरकारने घेतलेल्या नवीन निर्णयामुळे आता जिल्हा परिषदेसह पंचायत समितीचेही सर्कल वाढणार आहे. यात जिल्हा परिषदेचे पाच, तर पंचायत समितीचे दहा सर्कल वाढणार आहेत. त्यामुळे आता चारही विधानसभा क्षेत्रामध्ये जिल्हा परिषदेचे ५२ ऐवजी ५७ गट, तर पंचायत समितीचे १०४ ऐवजी ११४ गण होणार आहेत. आता कोणत्या सर्कलमध्ये बदल होणार हे येत्या दिवसांत कळणार असून त्यानुसार कार्यवाही सुरू झाली आहे.

२०११ च्या जनगणनेनुसार शासनाच्या अधिनियमामध्ये एका जिल्ह्यात कमीत कमी ५०, तर जास्तीत जास्त ७५ गट निर्धारित करण्यात आले होते. त्यानुसार वर्धा जिल्ह्याची असलेली ९ लाख ३८ हजार २५४० लोकसंख्या लक्षात घेता जिल्हा परिषदेचे ५२ गट, तर पंचायत समितीचे १०४ गण करण्यात आले होते. आता राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यातील लोकसंख्येमध्ये वाढ झाल्याने अधिनियमामध्ये दुरुस्ती करून कमीत कमी मर्यादा ५० वरून ५५, तर जास्तीत जास्त ७५ वरून ८५ गट केली आहे.

परिणामी आपल्या जिल्ह्यातील लोकसंख्या १० लाख ९३ हजार ८६४ झाल्याने गटसंख्या पाचने वाढविण्यात आली आहे. गटामध्ये पाचने वाढ झाल्याने गणही दहाने वाढले आहे. आर्वी, हिंगणघाट व सेलू तालुका वगळता इतर पाचही तालुक्‍यांमध्ये प्रत्येकी एक गट आणि दोन गण वाढणार आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीसाठी कोणते नवीन गट व गण तयार होतात, याकडे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here