ऑटो-दुचाकीच्या धडकेत तीन गंभीर! वर्धा-यवतमाळ मार्गावरील सालोड गावातील घटना

वर्धा : वळण मार्गावर ओव्हरटेक करण्याच्या नादात भरधाव दुचाकीने ऑटोला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वारासह दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. ही घटना वर्धा-यवतमाळ मार्गावर असलेल्या सलोड (हिरापुर) गावात बुधवार 15 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार एमएच 31 डीयू 7497 क्रमांकाची दुचाकी देवळीवरून वर्धेच्या दिशेने येत होती. दरम्यान सालोड येथील वळण मार्गावर दुचाकीस्वाराने वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला असता वर्धेवरून कळंबच्या दिशेने जात असलेल्या एमएच 17 एजे 7744 क्रमांकाच्या ऑटोला धडक दिली.

या अपघातात दुचाकीस्वार प्रवीण रामचंद्र मडावी (वय 28) रा. फत्तेपूर याच्या पायाला व हाताला गंभीर दुखापत झाली ऑटोतून प्रवास करत असलेल्या पूजा किशोर काळे (वय 26), लत्ता देवराब काळे (वय 60) दोन्ही रा. मंगरूळ दस्तगीर या गंभीर जखमी झाल्या आहेत. घटना घडताच गावातील नागरिकांनी तीनही जखमींना ऑटोतून सावंगी रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. सावंगी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून गुन्हा नोंद केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here