अंकिता जळीत प्रकरणाच्या सुनावणीचे संकेत! राज्यातील बहुचर्चित प्रकरणाकडे अनेकांच्या नजरा

राहुल खोब्रागडे

वर्धा : संपूर्ण राज्याला हादरवून सोडणारे अंकिता पिसुड्डे जळीत प्रकरणाच्या सुनावणीचे संकेत मिळत आहे. कोरोनामुळे मागे पडलेले हे प्रकरण लवकरच न्यायालयात येणार आहे. या संदर्भात शुक्रवारी (ता. १८) विशेष सरकारी वकिलांचे जिल्हा सरकारी वकिलांशी बोलणे झाल्याची चर्चा न्यायालयाच्या परिसरात होती. सदर प्रकरणाचे वकीलपत्र विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांच्याकडे असल्याचे यापूर्वीच शासनाकडून जाहीर करण्यात आले आहे. शासनाच्या सूचनेनुसार सोमवारपासून न्यायालयाचे कामकाज दोन पाळीत सुरू करण्याचे शासनाचे आदेश आहे. हे आदेश येताच रखडलेल्या प्रकरणांचेमार्ग मोकळे झाले आहेत. अशातच अंकिता पिसुड्डे जळीत प्रकरणातील साक्षी पुरावे सुरू करा अशा सूचना गृह विभागाकडून आल्याने लवकरच बहुप्रतीक्षित या जळीत प्रकरणाच्या साक्षी पुराव्यावर सुनावणी सुरू होणार असल्याचे बोलले जात आहे. ते कोणत्या कोर्टात चालवायचे या संदर्भात सध्या तरी काही निर्णय झाला नाही. ३ फेब्रुवारी २०२० रोजी अंकिता आपल्या महाविद्यालयात जात असताना आरोपी विकेश ऊर्फ विक्की नगराळे याने तिच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळले. यात ती गंभीर भाजली. नागपूर येथे उपचार सुरू असताना तिचा ११ फेकेब्रुवारी रोजी मृत्यू झाला. आरोपीला पोलिसांनी घटनेच्या दिवशीच अटक केली. घडलेल्या या प्रकरणाचे देशभर पडसाद उमटले. सदर प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालविण्याची मागणी झाली. शासनाकडूनही त्याला हिरवी झेंडी मिळाली. पण, याच काळात कोरोना संसर्गाने थैमान घातले. सर्वत्र लॉकडाउन झाल्याने हे प्रकरण मागे पडले. आता न्यायालयाचे कामकाज सुरू होणार असल्याने या प्रकरणाच्या सुनावणीचे संकेत मिळाले आहे. याकडे आता जनसामान्यांचे लक्ष लागलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here