कोरोनाबाधित रुग्णाचे रुग्णालयातून पलायन! विहिरीत आढळला मृतदेह; उलटसुलट चर्चेला आले उधाण

आर्वी : येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधित रूग्णाने रूग्णालयातून पलायन केले. काही वेळानंतर रूग्णाचा मृतदेह विहिरीत आढळून् आला. या घटनेने शहरात उलटसुलट चर्चेला उधाण आले असून आत्महत्या की घातपात, असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे. ही घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली. आमदार दादाराव केचे यांनी घटनास्थळी जात परिसराची पाहणी केली.विजय उत्तम खोडे रा. बोरगाव टु. असे मृताचे नाव आहे.

विजय खोडे याची चाचणी केली असता तो पॉझिटिव्ह आढळून आला होता. त्याला १४ रोजी आर्वीच्या उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर उपचार सुरू असून त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती. मात्र, शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास विजयने रूग्णालयातून पलायन केल्याने एकच खळबळ उडाली. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी शोध घेतला असता त्याच्या मोबाईल लोकेशनवरून तो पुलगाव मार्गावरील एका शेतात असल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी तपास केला असता त्याचा मोबाईल त्या ठिकाणी मिळून आल्याने परिसरात शोध घेतला असता एका विहिरीजवळ त्याचा दुपट्टा दिसून आला. तो दुपट्टा विजयचा असल्याचे त्याच्या भावाने सांगितले. ठाणेदार संजय गायकवाड, योगेश चहेल, अतुल भोयर, विजय तोडसाम, प्रकाश सानप विहिरीतून पाण्याचा उपसा सुरू केला. पण, पाणी भरपूर असल्याने मृतदेह मिळून आला नव्हता. आमदार दादाराव केचे यांनी याबाबत उपजिल्हा रुग्णालयात रात्री कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली. याचा तपास पोलीस करीत असून आत्महत्या की घातपात असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here