कोरोनामध्ये ‘चॅटिंग’मुळे संसाराची ‘सेटिंग’ बिघडली; २५ कुटुंबे दुभंगली! तीन महिन्यांत १७८ प्रकरणे न्यायालयात; अनेक जोडप्यांमधील अनैतिक संबंध झाले उघड

वर्धा : कोरोनात पती-पत्नी घरीच बंदिस्त झाले होते. बाहेर ये-जा बंद असल्याने सोशल मीडियावर पती, पत्नीचं इतरांशी चॅटिंग करण्याचे प्रमाण वाढले तसेच संशयी वृत्ती अन् मद्यपानही वाढले. यामुळे दाम्पत्यात खटके उडू लागले आणि प्रकरण थेट न्यायालयात पोहोचले. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत न्यायालयात घटस्फोटासाठी १७८ दावे दाखल करण्यात आले. यापैकी २५ दाव्यांमध्ये जोडप्यांचे घटस्फोट झाल्याची माहिती आहे.

घटस्फोटाच्या या वाढत्या आलेखातून कुटुंबसंस्थेला घरघर लागल्याची बाब उघड झाली. गेल्या वर्षभरापासून कोरोनाने कहर केला आहे. यातच लॉकडाऊनमध्ये अनेक जण घरीच बंदिस्त झाले. त्यामुळे अनेकांचे विवाहबाह्य संबंध चव्हाट्यावर आले. पत्नी जास्त वेळ मोबाईलवर चॅटिंग करीत असल्याने पतीच्याही संशयी वृत्तीत वाढ झाली. हातचे काम गेल्याने मद्यपान करून पत्नीस मारझोड करणाऱ्यांची संख्यादेखील वाढली. त्यानंतर दाम्पत्यात खटके उडू लागले. त्यातूनच वाद पोलीस ठाण्यात पोहोचला. काही प्रकरणांमध्ये तडजोड झाली, तर अनेक प्रकरणे न्यायालयात दाखल झाली.

गेल्या तीन महिन्यांत न्यायालयात तब्बल १७८ दावे दाखल करण्यात आले. त्यापैकी २५ दाव्यांमध्ये जोडप्यांना घटस्फोट मिळून ते विभक्त झाले, तर अनेक प्रकरणांत तडजोड होऊन त्यांचा संसार सुरळीत सुरू झाल्याची माहिती आहे. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये घटस्फोटाचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here