शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन! नुकसान भरपाई त्वरित देण्याची मागणी

पुलगाव : गेल्या 10 वर्षांपासून निम्न वर्धा प्रकल्पांमधून सोडलेल्या अतिरिक्त पाण्यामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमानात नुकसान होत आहे. अनेकवेळा शेतकऱ्यांनी आंदोलने करूनही त्याची नुकसान भरपाई शासनाकडून मिळाली नाही. त्यासाठी सोमवारी आष्टा- वढाळा येथील वर्धा नदीच्या पात्रात प्रहारच्या कार्यकर्त्यांसह. शेतक-यांच्या वतीने जलसमाधी आंदोलन करण्यात आले.

यावेळी क्रांतीसूर्य बिरसा मुंडा व कार्तिकी एकादशीमुळे विठुल-रुक्मिणीच्या प्रतिमेचे पूजन करून आंदोलनाला सुरुवात केली. धरणातील सोडलेल्या पाण्याने होणाऱ्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचा मोबदला मिळावा व वारंवार नुकसान होत असल्याने जमिनी संपादीत कराव्या, या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.

यावेळी प्रहारचे बाळा जगताप यांनी आंदोलनादरम्यान मार्गदर्शन केले. निम्न वर्धा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता बऱ्हाडे, निम्न वर्धा प्रकल्पाचे उपकार्यकारी अभियंता पांढरे, आवींचे नायब तहसीलदार कदम, मंडळ अधिकारी कुकडे, कृषी मंडळ अधिकारी ढगे यांच्यासोबत चर्चा व वाटाघाटी होऊन आंदोलनाची सांगता करण्यात आली. आंदोलनाच्या अंती कार्यकारी अभियंता यांनी एक महिन्यात सर्व पंचनामे, अहवाल तयार करून अधीक्षक अभियंता यांना सादर करू, असे सांगण्यात आले. महसूल विभाग, जलसंपदा विभाग, कृषी विभाग हे संयुक्तरित्या पंचनामे करून सर्व प्रतिलिपी आंदोलन करणाऱ्यांना देण्यात येईल.

जलसमाधी आंदोलनाचे नेतृत्व प्रहारचे राजेश सावरकर सरपंच रसुलाबाद, सोरटा सरपंच महेंद्र मानकर, उपसरपंच मंगेश मानकर, प्रमोद केने, सुशील बोबडे, अशोक ठाकरे, प्रशांत देशमुख, राजेश सोनकुसरे, सागर ठाकरे यांनी केले. या आंदोलनात गजानन थोटे, सतीश मसराम यांच्यासह वढाळा, पिंपळगाव, साळफळ, मारडा, रोहणा, सायखेडा, दह्यापू’ व तालुक्‍यातील शेतकरी गजानन थोटे, सतीश मसराम यांच्यासह परिसरातील गावांतील शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here