
मांडगाव : येथील आशिष कोचे यांच्या दुचाकी दुरुस्तीच्या दुकानात वर्धा येथील रहिवासी असलेल्या सहा व्यक्तींनी ऑटोने येत आशिष कोचे व आशिषचे वडील सुरेश कोचे यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला चढवून बेदम मारहाण केली. ही घटना शनिवारी घडली असून सदर घटनेत बाप-लेक जखमी झाले आहेत.
गावाबाहेरून येऊन काही व्यक्ती गावातील व्यक्तींना मारहाण करीत असल्याचे लक्षात येताच ग्रामस्थांनी एकत्र येत घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकाराची माहिती मिळताच हिंगणघाट पोलिसांनी आपल्या हालचालींना वेग देत सुरुवातीला दोन आरोपींना ताब्यात घेत पाठलाग करून आरोपींचा ऑटो सावंगी बेड्याजवळ पकडला. परंतु, संधी साधून ऑटोतील आरोपींनी पळ काढला. जखमी आशिष याला सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पुढील तपास हिंगणघाटचे ठाणेदार संपत चव्हाण करीत आहे. असे असले तरी ही मारहाण कुठल्या कारणावरून झाली हे कळू शकले नाही.