गोठ्याला लागली आग! नऊ जनावरे झाली जळून खाक; शेतकऱ्याचे दीड लाख रुपयांचे नुकसान

वडनेर : हिंगणघाट तालुक्यातील पिंपळगाव माथनकर येथे पहाटे 3 वाजताच्या सुमारास अजय नरेश घयरे यांच्या गावालगत असलेल्या गोठ्याला आग लागली. आगीत नऊ जनवरं आणि गोठा जळून खाक झाला. यात अजय घयरे याचे सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज त्यांनी वर्तविला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अजय घयरे याचा पिंपळगाव मा्थनकर येथे गावालगतच जनावरांचा गोठा आहे. त्यांनी शुक्रवारी सायंकाळी नेहमी प्रमाणे त्यांच्या मालकीच्या शेळ्या व त्याचे पिल्लं, म्हैस, गायी बांधल्या होत्या. शनिवारी पहाटे 3 वाजताच्या सुमारास गोठ्यातून आगीचे लोळ उठताना परिसरातील नागरिकांना दिसून आले. गावकऱ्यांनी गोठ्याकडे धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न केला. मात्र आगीत ४ शेळ्या, ४ पिल्लू , १ म्हैस, असे एकूण ९ जनावरांची राखरांगोळी झाली.

तसेच चार जनावरांना नागरिकांनी सुखरूप बाहेर काढले. आगीत शेतकऱ्याचा गोठा, जनावरांची वैरण जळाली असून शेतकरी अजय घयरे यांचे जवळपास दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. घटनास्थळी तलाठी डफ, मंडळ अधिकारी निनावे यांनी भेट देत पंचनामा करुन तातडीने मदत देण्याची मागणी पिंपळगाव माथनकर येथिल नागरिकांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here