

वर्धा : शहर परिसरात जखमी अवस्थेत भटकलेला उंट फिरत असल्याची माहिती सोमवार (ता. २४) स्थानिक नागरिकांनी पीपल फॉर अँनिमल्सच्या चमूला दिली. माहिती मिळताच या उंटाला पकडून त्याला उपचाराकरीता करुणाश्रमात दाखल करीत करुणाश्रमातील चमूने त्याच्यावर उपचार सुरु केले आहे. सध्या करुणाश्रामातील चमू या उंटाची काळजी घेत असून त्याच्या जखमा लवकरच बऱ्या होतील अशी माहिती पिपल फॉर अँनिमल्सचे कैस्तूभ गावंंडे यांनी दिली आहे.
काही दिवसापासून वर्धा शहरात एक मोकाट उंट घुसून शहराच्या विविध भागात फिरत होता. याबाबत स्थानिक नागरिकांनी पीपल फॉर अँनिमल्सच्या वर्धा चमुला माहिती दिली. सदर उंट सिव्हिल लाईन परिसरात आढळून आल्याने तशी माहिती पिपल फॉर अँनिमल्स वर्धा युनिटला आज मिळाली. संपूर्ण चमु सिविल लाईन येथे जाऊन सदर उंटाचे निरीक्षण केले असताना उंटाच्या नाकात जखमा व जंतू पडल्याचे दिसून आले त्यामुळे उंटाला भूल देऊन बेशुद्ध करून उंटावर प्रथमोपचार करण्यात आले व करुणाश्रम येथे दाखल करण्यात आले आहे. सदर उंटावर उपचार सुरू असून या उंटाच्या मालकाबाबत माहिती मिळाल्यास उंट मालकाला सुपूर्त करण्यात येईल अशी माहिती संस्थेद्वारे देण्यात आलेली आहे.