
वर्धा : जिल्ह्यातील विविध भागांमध्ये मोटारसायकल चोरीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असतानाच, स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी मोठी कारवाई करत एक सराईत चोरटा गजाआड केला आहे. या कारवाईत एकूण १३ चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून त्यांची अंदाजे किंमत ६ लाख ५ हजार रुपये आहे. स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, पथकाने वायगाव (नि.), ता. देवळी येथील वॉर्ड क्रमांक ५ येथील सुभाष गौतम मस्के (वय ५०) यास ताब्यात घेतले. सखोल चौकशीत आरोपीने वर्धा व यवतमाळ जिल्ह्यांतील तसेच इतर ठिकाणांहून मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली.
विशेष बाब म्हणजे, आरोपी यवतमाळ जिल्ह्यातील न्यायालयातील तारखेसाठी बसने जात असे आणि परत येताना रस्त्यात येणाऱ्या गावांमधून मोटारसायकली चोरी करत असे. या चोरी केलेल्या गाड्या तो खोटे कारण सांगून आपल्या परिचितांना गहाण ठेवत असे किंवा विक्री करत असे. आतापर्यंतच्या तपासात आरोपीने वर्धा जिल्ह्यातून ३, यवतमाळ व इतर जिल्ह्यांतून १० अशा एकूण १३ मोटारसायकली चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. या सर्व गाड्या जप्त करण्यात आल्या असून पुढील तपासासाठी आरोपी व जप्त गाड्या दहेगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत.
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक मा. श्री. अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कवडे यांच्या मार्गदर्शनात, पोलीस निरीक्षक श्री. विनोद चौधरी यांच्या सूचनेनुसार पो.उप.नि. उमाकांत राठोड, अमोल लगड, प्रकाश लसुंते, पो.अं. गिरीष कोरडे, मनोज धात्रक, अरविंद येनुरकर, मनीष श्रीवास, गजानन दरणे, रवि पुरोहित, विनोद कापसे (सर्व स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा) यांनी केली. पोलीस विभागाच्या या तात्काळ आणि अचूक कारवाईमुळे अनेक नागरिकांना त्यांच्या मालमत्तेची परतफेड होण्याची शक्यता असून, स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.



















































