सधन कुटुंबातील सदस्यांना दाखविले बांधकाम कामगार! नोंदणी जास्त; प्रत्यक्षात कामगार कमीच

पवनार : अवैधरीत्या नोंदणी झालेल्या बांधकाम कामगारांची संख्या मोठी असून, अर्थकारणातून दलालामार्फत अनेक सधन कुटुंबांतील सदस्यांची बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करून घेतली आहे. आधीच बांधकाम कामगार कार्यालयातील आर्थिक घोळ चव्हाट्यावर आला असून पवनार येथे कंत्राटदाराचे बनावट शिक्के मारून अनेकांनी बनावट कागदपत्र तयार केल्याचे एका कंत्राटदाराने सांगितले आहे. त्यामुळे याची सखोल चौकशी करण्याची मागणी पवनारवासीयांकडून केली जात आहे.

पवनार येथील अनेक नागरिकांनी पैसे देत दलालामार्फत बांधकाम कामगार म्हणून आपली नोंदणी करून घेतली. मुलांना शिष्यवृत्ती, आरोग्य सुविधेचा लाभ, घरगुती साहित्य, आदी योजनांचा लाभ मिळण्याच्या लालसेपोटी दलालांनी अनेकांना प्रलोभने देत नोंदणी केली. यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांचीही जुळवाजुळव दलालाकडूनच करण्यात आली. आरोग्य सुविधेचा लाभही अनेक सधन कुटुंबांतील सदस्यांनी घेतला. त्यासाठी दलालाला कमिशन दिल्याची बाब एक कुटुंबाने सांगितली होती. यात गावातीलच काहींचा सहभाग होता, प्रत्यक्षात कमिशन घेणारे मात्र दुसरे होते. मात्र, घेतलेले कमिशन परत केल्यामुळे ते प्रकरण तिथेच थांबले.

आणखी एका सधन कुटुंबाने स्वतःला बांधकाम कामगार दाखवून पतीच्या शस्त्रक्रियेसाठी आरोग्य सुविधेचा लाभ घेतला व त्यासाठी दलालास कमिशन दिल्याची चर्चाही गावात चांगलीच रंगली होती. अनेक सधन कुटुंबाने बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केली असून, काही कुटुंबातील पती, पत्नी, मुलगा या सर्वांना बांधकाम कामगार दाखविण्यात आले आहेत. सध्या बांधकाम कामगार कार्यालयाची चौकशी सुरू आहे. या चौकशीत अनेक मोठी नावे समोर येतील. हीच परिस्थिती जिल्ह्यातील जावागावांत आहे. याचीसुद्धा चौकशी झाल्यास मोठे घबाड पुढे येण्याची शक्‍यता आहे. खरे बांधकाम कामगार अनेक शासकीय योजनांपासून वंचित आहेत.ज्यांना खरंच गरज आहे त्यांना लाभ मिळणे गरजेचे आहे. कंत्राटदाराचे खोटे सही-शिक्के मारून अनेकांनी खोटी कागदपत्रे तयार केल्याचे एका कंत्राटदाराने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले असून, याचीही चौकशी होण्याची मागणी केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here