

देवळी : येथील कॅनरा बँकेमधील बनावट कागदपत्रे बनवून बोगस शेतकऱ्याने पीक कर्ज लाटल्याचे प्रकरण युवा संघर्ष मोर्चाने उघडकीस आणल्यानंतर आज जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक श्री बिरेंद्रकुमार बँक शाखा व्यवस्थापकांच्या बैठकीसाठी देवळी पंचायत समिती येथे आले असता यूवा संघर्ष मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना घेराव घालून बनावट पीक कर्जाची माहिती दिली .
अधिकार्यांसोबतच चर्चा करून निवेदन देत सर्व राष्ट्रीयकृत बँकेमधील पीक कर्जाच्या महसुली दस्ताऐवजाची फेर पडताळणी करण्याबाबत बँकांना आदेश देण्याची मागणी करण्यात आली तसेच आज देवळी शहरातील सर्व बँकांना भेटी देत शाखा व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले आणि त्यांच्या बँकेतील पीक कर्जासाठी जोडण्यात आलेले महसुली दस्ताऐवजाची (७/१२,आठ अ, फेरफार, चतु:सीमा, नकाशा) फेर पडताळणी करण्याची मागणी केली. तसेच तहसीलदार यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व कागदपत्रांची फेर पडताळणी केल्यास बँक व शासनाची दिशाभूल करणाऱ्यांना आळा घालता येईल सोबतच सर्वसामान्य शेतकऱ्यांची फसवणूक होण्यापासून बचाव करता येईल असे संघटणेकडून सांगण्यात आले. यावेळी युवा संघर्ष मोर्चाचे किरण ठाकरे, गौतम पोपटकर, प्रवीण कात्रे, कृष्णकांत शेंडे, रामभाऊ अंभुरे, हारुन तंवर, सागर पाटणकर, पत्रकार सत्तारभाई शेख, योगेश कांबळे यांची उपस्थिती होती.