
वर्धा : वेळ मध्यरात्री १.3० वाजताची… मुसळधार पाऊस… सर्वत्र अंधार… अन् अचानक जोराने झालेला आवाज… अन् नागरिकांची झोप उडडाली… कुणी म्हणे बॉम्ब ब्लास्ट झाला असेल; तर कुणी म्हणे भूकंपाचे धक्के बसले… मात्र असे काहीही नव्हते. ती तर चक्क वीज गडगडली होती. मात्र, या घटनेने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली तर अनेकजण मध्यरात्रीच घराबाहेर पडले होते.
शनिवारी रात्रीपासून शहरात पावसाला सुरुवात झाली. त्यातच वादळ आणि विजांचा कडकडाट सुरू झाला. ढगही भरून आले होते. मध्यरात्री नागरिक घरात साखरझोपेत असतानाच अचानक १.३० ते दोन वाजण्याच्या सुमारास जोराने आवाज आला. हा आवाजे ऐकून लहान मुलेही रडू लागली; तर नागरिकही झोपेतून खडबडून जागे होत घराबाहेर पडले. कुणाला वाटले पुलगाव येथे बॉम्ब ब्लास्टिंग झाले असेल; तर कुणी म्हणाले भूकंपाच्या धक्क्याचा आवाज असेल, तर कुणी आकाशात उल्का फुटली असेल असे म्हणू लागले. रात्रभर नागरिक दहशतीत झोपले होते. मात्र, तो आवाज कशाचा होता हे सकाळपर्यंत कुणालाही माहिती झाले नाही.
हा आवाज पुलगाव, हिंगणघाट, सेलू, आदी तालुक्यांतही आल्याचे अनेकांनी सांगितले. मग काय, यवतमाळ येथे झालेल्या भूकंपाचा हादरा तर बसला नसेल ना, अशी चर्चाही रंगू लागली. पण, असे काहीही नव्हते. मध्यरात्री झालेला आवाज हा वीज गडगडल्याचा होता. सुमारे दोन ते तीन मिनिटे हा आवाज येत राहिला. मात्र, ही घटना शहरासह जिल्ह्यात रविवारी सकाळपासूनच चर्चेचा विषय ठरली होती.