
भिडी : कारचालकाचे कार वरील नियंत्रण सुटल्याने कारचा अपघात झाला. या अपघातात कार चालकासह महिला जागीच ठार झाली. तर एक जण जखमी झाला. ही घटना वर्धा-यवतमाळ राष्ट्रीय महामार्गावव भिडी शिवारात शनिवारी 24 नोव्हेबर रोजी दुपारच्या सुमारास घडली. संजय गेडाम (35 रा. मदना), नीलिमा हरिदास पाटील (65 रा. कासारखेडा) असे मृतकाचे तर हरीदास शामराव पाटील (80 रा. कासारखेडा) असे जखमीचे नाव आहे.
आर्वी तालुक्यातील कासारखेडा येथील माजी जिल्हा परिषद सदस्य हरिदास पाटील हे त्याच्या पत्नीसह यवतमाळ येथे तेराव्याच्या कार्यक्रमासाठी एमएच 31 सीएम 6182 क्रमांकाच्या कारने कासारखेडा येथून निघाले होते. दरम्यान भरधाव कार वरील कारचालक संजय भानुदास गेडाम यांचे सुटल्याने कार दिशादर्शक फलकाला धडक देत खाईत उलटली. या अपघातात चालक संजय गेडाम आणि माजी प्राचार्य नीलिमा हरिदास पाटील यांचा मृत्यू झाला. तर माजी जि. प.सदस्य असलेले हरिदास पाटील गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच देवळी पोलिस पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. जखमीला भिंडी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. स्थिती नाजूक असल्याने तेथे प्रथमोपचार करून वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. पुढील तपास देवळी पोलिस ठाण्याचे ठाणेदार भानूदास पिदूरकर यांच्या मार्गदर्शनात उप निरीक्षक सुमित काबंळे, लोभेश गाडगे, प्रकाश निमजे करीत आहे.


















































