
वर्धा : बँकेत पैसे मोजत असलेल्या ज्येष्ठ नागरिकाची हातचलाखी करून फसवणूक करणाऱ्या इराणी टोळीतील एकास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. नासिर अली आमीर अली (वय ४५, रा. माडा चौक, आजरी माजरी, यशोधरा, नागपूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून त्याने साथीदाराच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.
दि. १३ मे रोजी विठ्ठल कवडू कुबडे (वय ६७, रा. वडनेर) हे वना नागरी सहकारी बँक वडनेर येथे पैसे काढून मोजत असताना एक अनोळखी इसम त्यांच्या जवळ येऊन पैसे मोजण्याच्या बहाण्याने हातातील रोकड घेतली व हातचलाखी करत पैसे घेऊन पसार झाला. हा प्रकार लक्षात येताच कुबडे यांनी दुसऱ्या दिवशी वडनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करीत होते. या दरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे नागपूर जिल्ह्यातील माडा चौक येथे राहणाऱ्या नासिर अली आमीर अली याला दि. १५ मे रोजी अटक करण्यात आली. चौकशीत त्याने साथीदार शेख रफिक शेख युसुफ (रा. नवाबपुरा, लकडापुरा, नागपूर) याच्यासह गुन्हा केल्याची कबुली दिली.
या कारवाईस पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कवडे यांचे मार्गदर्शन लाभले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, पोउपनि सलाम कुरेशी तसेच पोलीस अंमलदार शेखर डोंगरे, सचिन इंगोले, प्रमोद पिसे, रामकिसन इप्पर, विकास मुंडे, सुगम चौधरी, अरविंद इंगोले, राहुल अधवाल यांनी संयुक्तरीत्या ही यशस्वी कारवाई केली.




















































