सायबर गुन्हेगारी फोफावतेय! बेरोजगारांनो सावधान…; डमी वेबसाईटद्वारा घातला जाऊ शकतो गंडा: सतर्क राहण्याचे आवाहन

वर्धा : लॉकडाऊनमध्ये नोकऱ्या गेल्याने अनेक जण नोकरीच्या शोधात आहेत. अशा नागरिकांचे वर्क फ्रॉम होमचे आमिष दाखवून ऑनलाईन फसवणूक करणारी टोळी सक्रिय झाली आहे. शहरासह नोकरीच्या आमिषातून ऑनलाईन गंडविल्याचे प्रकार समोर येत असतानाच नागरिकांनी अशा सायबर भामट्यांपासून सावध राहण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी केलेले आहे.

लॉकडाऊन काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. त्यामुळे नोकरीच्या शोधात अनेकांनी क्विकर जॉबसारखे अप्लिकेशन किंवा जॉब मिळवून देणाऱ्या ज्या ऑनलाईन कंपनी आहेत त्या कंपनीकडे नोकरीसाठी अप्लाय केले आहे. अनेक जण मोबाईल किंवा मेलवर आलेल्या लिंकवर क्लिक करतात. त्यांना आपली वैयक्तिक माहिती देतात अनेकांना आता नोकरीबाबचा कॉल येईल असे वाटत असते. पण, त्यांच्या बँक खात्यातून लाखोंची रक्कम परस्पर काढून घेण्यात येते. मोबाईल क्रमांक बँक अकाऊंटशी कनेक्ट असल्याने अशांची फसवणूक होते.

जिल्ह्यातही लॉकडाऊन काळात अशा घटना घडल्या असून नोकरीचे आमिष दाखवून अनेकांना गंडविल्याच्या घटना समोर आल्यात. काहींनी पोलिसात तक्रार दिली तर काहींनी बदनामी खातर पोलिसात जाणे टाळले. इतरही प्रकारे नागरिकांनी सायबर भामट्यांकडून फसवणूक करण्यात येत असल्याच्या घटनाही वाढल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी अधिक सावध राहून कुठलीही वैयक्तिक माहिती, ओटीपी क्रमांक कुणालाही देऊ नये, नोकरीसाठी कॉल आल्यास संबंधित कंपनीशी संपर्क करून तसेच योग्य खातरजमा करूनच माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस विभागाकडून तसेच सायबर सेलकडून करण्यात येत आहे.

अशी करा खातरजमा…

– कुठलीही कंपनी इंटरव्ह्यूशिवाय नोकरी किंवा ट्रेनिंग देत नाहीत. तसेच ऑफर लेटरही मेल करीत नाहीत. तेव्हा अशाप्रकारच्या ईमेल्सना उत्तर देणे टाळावे.

– कुठलीही कंपनी, बँक, फायनान्शिअल संस्था विनाकारण कुणालाही बक्षीस देत नाही. शक्यतो अशी ईमेल्स स्पॅमपध्ये आपोआपच टाकली जातात. परंतु, शेवटी ती एक यंत्रणा आहे त्यामुळे साहजिकच त्याला मर्यादा असतात. आपण मात्र, सावध राहणे आवश्यक आहे.

अशी होऊ शकते फसवणूक…

एका युवतीने ऑनलाईन वेबसाईटवर नोकरीसाठी अप्लाय केला होता. दोन दिवसांतर संबंधित कंपनीकडून मेल्स आले आणि वैयक्तिक माहिती विचारली. रजिस्ट्रेशनसाठी १० रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करा, असे सांगण्यात आले. युवतीने पैसे ट्रान्सफर करताच तिच्या खात्यातून ४५ हजार रुपये परस्पर काढून घेण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here