
रोहणा : गावात मागील १५ दिवसांपासून नळांना गढूळ पाणी पुरवठा केला जातो आहे. हे पाणी पिण्यायोग्य नसून हा प्रकार न थांबल्यास नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. गावकऱ्यांनी याची सरपंचांकडे तक्रार केली असता नदीघाटात असलेल्या विहिरीसभोवताल डिझेल बोटी असल्याचे दिसून आले. सरपंचांनी नदीपात्रात जात तेथे असलेल्या विहिरीची पाहणी केली असता नदीपात्रात डिझेलवर चालणाऱ्या बोटी आणि पोकलॅनद्वारा वाळूचा अवैध उपसा सुरू असल्याचे दिसून आले.
यामुळे नदीपात्रातील पाणी ढवळले जात असून गढूळ होत आहे. तसेच, बोटीच्या इंजीनमधील डिझेल आणि ऑईलगळती होऊन ते पाण्यात मिसळते व तेच पाणी नदीपात्रातील विहिरीत झिरपून नळावाटे गावात येत आहे. ही बाब काही युवकांनी कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली. पण काहीही सुधारणा करण्यात आली नाही. आज पुन्हा सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पावडे, पोलीस पाटील मिथुन ताल्हणसह काही युवकांनी वर्धा नदीच्या सायखेडा घाटावर जात पाहणी केली असता पोकलॅन व बोटीच्या साह्याने वाळू उपसण्याचे काम सुरू असल्याचे दिसून आले.



















































