
वर्धा : पिंपळखुटा येथून वाहनात कोंबडी भरून वर्ध्याकडे जाणाऱ्या वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्याकडेला उलटले. या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला तर क्लीनर जखमी झाला. हा अपघात खरांगणा शिवारात २८ रोजी पहाटेच्या सुमारास झाला. याप्रकरणी खरांगणा पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली. सरवर गफ्फूर शेख (२८) रा. बोरगाव मेघे असे मृतकाचे नाव आहे. तर बाळकृष्ण मेश्राम (२९ रा.वर्धा असे जखमीचे नाव आहे.
आर्वी तालुक्यातील पिंपळखुटा येथील पोल्ट्रीफार्ममधून एम.एच.३१ सीयू. ५८४९ क्रमांकाच्या वाहनात कोंबड्या भरुन वर्धा येथे जात असताना खरांगणा घाट परिसरात पहाटे ४:४० वाजताच्या सुमारास चालकाचे स्टेअरिंगवरून नियंत्रण सुटले. वाहन अनिवंत्रित होऊन रस्त्याकडेला उलटले. यात चालक सरवर स्टेअरिंगमध्ये अडकल्याने त्याचा मृत्यू झाला. तर बाळकुष्ण हा जखमी झाला. याप्रकरणी खरांगणा पोलिसांना माहिती मिळताच पोलिस अपघातस्थळी दाखल झाले. मृतदेह वाहनाबाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. जवळपास दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहन बाजूला करत वाहतूक सुरळीत केली. पुढील तपास पोलिस करीत आहे.


















































