

पवनार : विद्यार्थ्यांच्या मेहनतीला आणि त्यांच्या कुटुंबाच्या त्यागाला सलाम करत, पवनार येथील दहावी परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा घरोघरी जाऊन सत्कार करण्यात आला. यंदाच्या दहावी परीक्षेत पवनारमधील अनेक विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या विद्यार्थ्यांनी आपल्या चिकाटीने, सततच्या प्रयत्नांनी आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाने हे यश मिळवले. त्यांना केवळ गुणांची नव्हे, तर जीवनाला दिशा देणाऱ्या या टप्प्याची खरी जाणीव देण्यासाठी कार्यकर्त्यांनी हा पुढाकार घेतला.
भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष नितीन कवाडे यांनी स्वतः पुढाकार घेत, नबीरा शारिक शेख, अनुभव अनंत साटोने, धनश्री संजय उमाटे, कृत्तिका मनोहर पाटील व भारती सुभाष इखार या गुणवंत विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. त्यांच्या पालकांचंही विशेष अभिनंदन करण्यात आलं. विद्यार्थ्यांच्या यशामागे केवळ त्यांच्या अभ्यासाचीच नव्हे, तर त्यांच्या कुटुंबाची आणि शिक्षकांची सामूहिक मेहनत दडलेली असते. अशा गुणवंतांचा गौरव गावासाठी प्रेरणादायी ठरतो, असे मत श्री. कवाडे यांनी व्यक्त केले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत तोटे, राजू बावणे, प्रशांत भोयर, नितीन भोयर, अनुप चंदनखेडे, जानिक काळबांडे, वासुदेव सावरकर, सुरेश इखार, आशिष भोयर आणि रामदास देवतळे यांचा सक्रिय सहभाग होता. गावकऱ्यांनीही या उपक्रमाचे मनःपूर्वक स्वागत केले. या व्यक्तिगत सत्कार यात्रेमुळे गावातील शिक्षण क्षेत्रात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली. गावात पुढील वर्षीही अशाच प्रकारे गुणवंतांचा गौरव होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.