जिल्ह्यातील वीजबाधितांना मदत! पशुपालकांसाठी ११ लाख ६७ हजार रुपयांचा निधी मंजूर

सतीश खेलकर

वर्धा : जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली होती. या दरम्यान वीज कोसळून तब्बल पंधरा जनावरे व दोन व्यक्तींचा मृत्यू झाला होता. या घटनेतील मृतांचे वारस व पशुपालकांसाठी ११ लाख ६७ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला असून, तो तालुकास्तरावर वळता करण्यात आला आहे. 

सेलू तालुक्यातील सालई (कला) येथील ललित शेषराव उईके व देवळी तालुक्यातील रत्नापूर येथील रामा पांडुरंग मांगुळकर यांचा वीज पडून मृत्यू झाला होता. या घटनेतील मृतांच्या वारसांना शासकीय मदत मिळाली म्हणून प्रशासनाच्या वतीने प्रस्ताव पाठविण्यात आला.

शासनाने प्रशासनाच्या या प्रस्तावास मंजुरी देत मृतकांच्या वारसांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत मंजूर केली आहे. त्या सोबतच वर्धा तालुक्यात एक, सेलू तालुक्यातील तीन,  देवळी व आर्वी तालुक्यात प्रत्येकी एक, हिंगणघाट तालुक्यात चार तर समुद्रपूर तालुक्यात ५ जनावरांचा वीज पडून मृत्यू झाला होता. या सर्व पशुपालकांना शासकीय मदत मिळावी याकरिता देखील प्रशासनाने प्रस्ताव पाठविले होते.

पंधरा जनावरांच्या मृत्यूपोटी ३ लाख ६७ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त हा निधी वितरणासाठी तालुकास्तरावर वळता करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच नुकसानग्रस्त पशुपालक तसेच मृतांच्या वारसांना ही मदत मिळणार असल्याचे प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here