पैशाचा वाद! हॉटेलमालकाने केली नोकराची निर्घृण हत्या; पोलिसांनी आरोपीस ठोकल्या बेड्या

वर्धा : पैशाच्या कारणातून झालेल्या वादात मद्यधुंद हॉटेलमालकाने नोकराला दुचाकीवर बसवून पिपरी मेघे परिसरातील जुना पाणी चौकातील उड्डाणपुलावर नेले. तेथे वाद करुन हॉटेलमधील नोकराच्या गळ्यावर आणि हातावर चाकूने सपासप वार करून निर्घृण हत्या केली. ही घटना १६ ऑगस्ट रोजी सकाळी उघडकीस आली. अमोल मसराम (३२) रा. कारला चौक असे मृतकाचे नाव आहे. तर महेश मसराम ऊर्फ महेश मॅटर असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

आरोपी महेश मसराम ऊर्फ महेश मॅटर याचे बायपास रस्त्यावर असलेल्या कारला चौकात एस.एम. बिर्याणी नामक हॉटेल आहे. याच हॉटेलमध्ये मृतक अमोल मसराम हॉ काम करीत होता. मात्र, दोन ते तीन दिवसांपूर्वी दोघांत पैशाच्या कारणातून वाद झाला होता. याच वादाचा वचपा काढण्यासाठी आरोपी महेश मसराम याने १४ ऑगस्ट रोजी अमोलला जीवे मारण्याचा कट रचला. रात्रीच्या सुमारास आरोपी महेश हॉटेलात गेला. तेथे त्याने दारू ढोसली. मृतक अमोललाही दारू पाजली. त्यानंतर आरोपी महेश याने मृतक अमोलला दुचाकीवर बसवून बायपास रस्त्याने पिपरी मेघे येथील जुना पाणी परिसरातून जाणाऱ्या उड्डाणपुलावर नेले. तेथे पुन्हा आरोपी महेश मॅटर याने मृतकाशी वाद करून जवळील चाकूने त्याच्या गळ्यावर, पाठीवर तसेच हातापायांवर सुमारे दहा ते बारा वेळा सपासप वार करुन तेथून निघून गेला. अमोलचा मृतदेह उड्डाणपुलावरच रक्‍ताच्या थारोळ्यात रात्रभर पडून राहिला.

१६ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास नागरिकांना मृतदेह दिसून येताच त्यांनी तत्काळ रामनगर पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जात पाहणी केली. दरम्यान, मृतकाच्या घरच्यांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सामान्य रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी मृतकाचा मावसभाऊ आकाश चिंधूजी इरपाते याने रामनगर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके, उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप, पोलीस निरीक्षक हेमंत चांदेवार यांनी धाव घेत पाहणी केली. घटनास्थळी ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here