कारंजा : राज्य शासनाच्या निर्णयानुसार मासेमारीकरिता सहा महिने मुदतवाढ न दिल्यामुळे कारंजा तालुक्यातील कार नदी मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेच्या सभासदांनी चार एप्रिलपासून कारंजा येथील तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले. आज उपोषणाचा दुसरा दिवस होता. कारंजा येथील खैरी कार नदी प्रकल्पावर राज्य शासनाच्या निर्णयानुसार मासेमारीसाठी सहा महिने मुदतवाढ मिळूनसुद्धा कार नदी मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेला मुदतवाढ दिली गेली नसल्याचा आरोप उपोषणाला बसलेल्या मासेमारांनी केला आहे.
कारंजा तालुक्यातील स्थानीक कार नदी मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था आहे. या संस्थेमध्ये तालुक्यातील विविध गावांतील48 जण सभासद आहेत. अनेक दिवसांपासून मत्स्य विभागाकडे पाठपुराबा करूनसुद्धा अद्यापपर्यंत संस्थेला मुदतवाढ न मिळाल्याने तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले. उपोषणात संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मण नांदने, सचिव हरिचंद नांदने, उमेश अमझिरे, पांडुरंग नांदने, शंकर अमझिरे, रवी नांदने, अशोक बोरवार, अलंकेश नांदने आदी सहभागी झाले आहे.