वर्धा शहराला तीन दिवस मिळणार नाही पाणी! येळाकेळीत धामचे नदीपात्र होतेय स्वच्छ : पाणी जपून वापरण्याचे न.प.चे आवाहन

वर्धा : धाम नदीच्या पवनार व येळाकेळी येथील पात्रातून पाण्याची उचल करून वर्धा नगरपालिका प्रशासन वर्धा शहरातील सुमारे १७ हजार कुटुंबाला पाणी पुरवठा करते. पण सध्या येळाकेळी येथील धाम नदीचे पात्र बजाज फाऊंडेशनच्या मदतीने वर्धा पाटबंधारे विभाग करीत आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस शहरातील अर्ध्या परिसरात पाणी पुरवठा होणार नसल्याचे नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन वर्धा नगरपालिका प्रशासनाने केले आहे.

वर्धा पाटबंधारे विभाग, वर्धा नगरपालिका प्रशासन, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने धाम नदी स्वच्छता अभियान राबविण्याचे निश्चित करण्यात आले. त्याला जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी २७ मे रोजी मान्यता दिल्यानंतर शुक्रवार २८ मेपासून प्रत्यक्ष गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. पाच पोकलेनच्या साहाय्याने सध्या धाम नदीतील गाळ काढला जात असून हे काम युद्धपातळीवर पूर्ण केले जात आहे.

धाम नदीची पाणी साठवण क्षमता वाढावी तसेच ती स्वच्छ व्हावी हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. शनिवारी वर्धा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी सुनील रहाणे, वर्धा नगरपालिका पाणी पुरवठा विभागाचे नीलेश नंदनवार आदींनी येळाकेळी गाठून प्रत्यक्ष सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. सलग तीन दिवस नळाला पाणी येणार नसल्याने नागरिकांनाही उपलब्ध पाण्याचा काटकसरीनेच वापर करावा लागणार आहे.

या भागातील नळांना येणार नाही पाणी-

धाम नदीपात्र स्वच्छ केले जात असल्याने वर्धा शहरातील गौरक्षण वॉर्ड, कृष्णनगर, बॅचलररोड, राजकला टॉकीज रोड, भामटीपुरा, तेलीपुरा, साईमंदिर रोड, निर्मल बेकरी, रामनगर, धंतोली, पोद्दार बगिचा, इंदिरा मार्केट, वंजारी चौक, सराफ लाईन, अंबिका चौक, पटेल चौक, गुजराती भवन, पावडे चौक, राधानगर, म्हाडा कॉलनी, मानस मंदिर, गजानननगर, गोंड प्लॉट, स्टेशन फैल, तारफैल, दयालनगर, अशोकनगर, एम.जी. कॉलनी, जाकीर हुसैन कॉलनी या भागात पुढील तीन दिवस पाणी पुरवठा होणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here