पोलीस कर्मचाऱ्याच्या खासगी वाहनाची उभ्या कारला धडक! चार जण गंभीर; दोन महिलांसह दोन बालकांचा समावेश: कारला-साटोडा चौकादरम्यानचा अपघात

वर्धा : रस्त्याच्या बाजुला असलेल्या माठाच्या दुकानातून खरेदी केलेले माठ कारमध्ये ठेवत असताना मागाहून खासगी कारने भरधाव आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने जबर धडक दिली. धडकेत उभ्या कारमधील तिघे आणि माठ ठेवत असलेली महिला, असे चौघेही गंभीर जखमी झाले. हा अपघात गुरुवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास बायपास मार्गावरील कारला ते साटोडा चौकादरम्यानच्या ठाकरे माठ भंडारसमोर झाला.

प्राप्त माहितीनुसार प्रसाद चिंचोळकर रा. रमानगर आलोडी, हे पत्नी सुवर्णा, मुलगी कृतिका, मुलगा कार्तिक आणि आई यांच्यासोबत एम. एच. ३२ वाय. ४२७२ क्रमांकाच्या कारने बायपास लगतच्या ठाकरे माठ भंडारमध्ये माठ विकत घेण्याकरिता गेले होते. प्रसाद चिंचोळकर यांनी रस्त्याच्या बाजुला कार उभी करुन ते व पत्नी सुवर्णा दोघेही माठ घेण्याकरिता दुकानात गेले.

माठ घेतल्यानंतर प्रसाद पैसे देत असताना सुवर्णा या माठ ठेवण्याकरिता कारच्या डिक्कीजवळ गेल्या. यादरम्यान एम. एच. ३१ इ. ए. १९७९ क्रमांकाच्या खासगी कारने भरधाव येणाऱ्या पोलीस कर्मचाड्ढयाने मागाहून जबर धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की चिंचोळकर यांच्या कारची मागील बाजू चकनाचूर झाली. तर पोलीस कर्मचाऱ्याचेही वाहन रस्त्याच्या बाजुला पलटी झाले. या अपघातात सुवर्णा चिंचोळकर यांच्यासह कारमध्ये बसून असलेल्या त्यांच्या सासू आणि दोन्ही मुले गंभीर जखमी झालेत.

अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी लगेच घटनास्थळाकडे धाव घेतली असून जखमींना तात्काळ उपचाराकरिता सावंगी रुग्णालयात हलविण्यात आले. पोलीस कर्मचाऱ्याने अपघातग्रस्त कारमधून बाहेर पडून घटनास्थळावरुन पळ काढल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली. या अपघातात ठाकरे माठ भंडार या दुकानातील जवळपास शंभर माठ फुटल्याने त्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. घटनास्थळ हे सावंगी (मेघे) पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असल्याने सावंगी पोलिसांशी संपर्क साधला असता दोन महिला व दोन मुले असे चार व्यक्ती जखमी झाले असून त्यांच्यावर सावंगीच्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. तसेच या प्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आता पोलीस कर्मचारीच या अपघातात आरोपी असल्याने त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करणार की पळवाटा शोधणार? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here