खुनातील फरार आरोपी अखेर जेरबंद ; ड्रोनच्या सहाय्याने पोलिसांचा सापळा ! पडेगाव शिवारातून अटक

वर्धा : सालोड हिरापूर येथील तलावाजवळ झालेल्या खुनातील फरार आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले. 13 सप्टेंबर रोजी विशाल उर्फ ब्लेड विठ्ठल उजवणे (रा. सालोड हिरापूर) याचा गळा आवळून खून करण्यात आला होता. घटनेच्या वेळी त्याच्यासोबत बॉबी महेशगौरी व विजय मसराम हे उपस्थित असल्याची माहिती मिळाली होती. घटनेनंतर हे दोघे फरार झाल्याने त्यांच्यावर संशय व्यक्त करण्यात आला.

मा. पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेची दोन पथके आरोपींच्या शोधासाठी रवाना केली. आरोपी वारंवार ठिकाण बदलत असल्याने ड्रोनच्या साहाय्याने जंगल व शेतशिवार परिसरात पाहणी करण्यात आली. सलग तपासानंतर आज, 16 सप्टेंबर रोजी आरोपी पडेगाव शेतशिवारात फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार घेराबंदी करून दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी खुनाची कबुली दिली.

अटक आरोपींत बॉबी दिलीप महेशगौरी (वय 25) व विजय देवरावजी मसराम (वय 19, दोन्ही रा. सालोड हिरापूर) यांचा समावेश आहे. त्यांना पुढील कारवाईसाठी सावंगी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक अनुराग जैन व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांचे पो.नि. विनोद चौधरी, सपोनि पंकज वाघोडे, पो.उ.नि. उमाकांत राठोड, विजयसिंग गोमलाडू, अंमलदार सचिन इंगोले, प्रमोद पिसे, अमरदीप पाटील, राजेश अकाली, संजय राठोड, अरविंद इंगोले, सुमेध शेंद्रे तसेच सायबर सेलचे अक्षय राऊत यांनी संयुक्तरीत्या केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here