

वर्धा : संचारबंदीच्या नियमांना बगल देणाऱ्या छोट्या व मोठ्या व्यावसायिकांवर धडक कारवाई करण्यास वर्धा नगर पालिकेने सुरूवात केली आहे. मंगळवारी मुख्य बाजारपेठेतील तब्बल 3८ दुकाने सील करीत १५ हातगाड्या जप्त केल्यानंतर बुधवारी तब्बल ४५ हातगाड्या जप्त करीत आठ दुकाने सील करण्यात आल्याने वर्धा शहरातील बेशिस्त व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. याच कठोर निर्बधांच्या काळात अत्यावश्यक सेवेची प्रतिष्ठाने सकाळी ७ ते ११ या काळात सुरू ठेवण्याची परवानगी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी दिली आहे. परंतु, अनेक बेशिस्त व्यावसायिक जिल्हा प्रशासनाच्या पाठ दाखविण्यात धन्यता मानत असल्याने वर्धा तालुक्यात कोविडचा झपाट्याने प्रसार होत असल्याचे जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले आहेत.
कोविड संसर्गाची साखळी तोडण्यासह बेशिस्तांना ग्रिस्त लावण्याच्या सूचना वर्धा नगरपालिका प्रशासनाला मिळताच आता न.प.चे मुख्याधिकारी विपीन पालिवाल, प्रशासकीय अधिकारी किशोर साखरकर यांच्या नेतृत्त्वात वर्धा नगरपालिकेच्या दहा पथकातील कर्मचाऱ्यांकडून धडक कारवाईला सुरूवात करण्यात आली आहे. न.प.च्या कोविड नियंत्रण पथकात नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसह कर्मचारी तसेच पोलीस विभागातील कर्मचारी आहेत. याच कर्मचाऱ्यांनी बुधवारी ४५ हातगाड्या जप्त करीत आठ दुकानांना सील ठोकले.