धावत्या ट्रकने घेतला पेट! वाहनाबाहेर दोघांनी उडी घेतली थेट

कारंजा (घाडगे) : ‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीला साजेल अशीच काहीशी घटना शुक्रवारी रात्री १० वाजताच्यासुमारास नागपूर-अमरावती महामार्गावरील राजनी शिवारात घडली. तिरोडाच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव ट्रकने अचानक पेट घेतल्याने ट्रकचालकासह क्लिनरने रस्त्याकडेला वाहन उभे करीत थेट वाहनाबाहेर उड्या घेतल्या. त्यामुळे हे दोघेही थोडक्यात बचावले. या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नसली, तरी ट्रकमधील कोंबड्यांचे खाद्य तसेच ट्रक जळून कोळसा झाला. शिवदास झुमरू कोळी (वय ५५) आणि राकेश बापूराव मोरे (१९) असे अनुक्रमे थोडक्यात बचावलेल्या चालक व क्लिनरचे नाव आहे.

टँकर बोलावून मिळविले परिस्थितीवर नियंत्रण

ट्रकला आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत टोल प्लाझा प्रशासनाला माहिती दिली. त्यानंतर पाण्याचा टँकर बोलावून परिसरातील नागरिकांच्या मदतीने आगीवर पाण्याचा मारा करून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले.

जेवणासाठी थांबण्यापूर्वीच ट्रकने घेतला पेट

साहित्य घेऊन मालेगाव येथून तिरोडाच्या दिशेने निघालेला (एमएच ४० सी.डी. ३१२५) क्रमांकाच्या ट्रकमधील चालक शिवदास व क्लिनर राकेश हे जेवणासाठी रस्त्याकडेला असलेल्या धाब्यावर थांबणार इतक्यात भरधाव ट्रकने अचानक पेट घेतल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर चालकाने मोठे धाडस करून वाहनावर नियंत्रण मिळवित वाहन रस्त्याकडेला उभे करून वाहनातील दोघांनीही वाहनाबाहेर वेळीच पळ काढल्याने ते थोडक्यात बचावले.

ट्रकमध्ये होते कोंबड्यांचे खाद्य

नागपूर-अमरावती महामार्गावरील राजनी शिवारात जळून कोळसा झालेला हा ट्रक कोंबड्यांचे खाद्य घेऊन तिरोडाच्या दिशेने जात होता. या घटनेत ट्रकमधील कोंबड्यांचे संपूर्ण खाद्य आणि ट्रक जळाल्याने सुमारे २० लाखांचे नुकसान झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here