जिल्हा सामान्य रुग्णालयात झाली २२ रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया! शस्त्रक्रियामध्ये सात वर्षाखालील तीन चिमुकल्यांचा समावेश

वर्धा : असोसिएशन ऑफ सर्जन इंडिया, नागपूरच्या पुढाकारातून वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयात शनिवारी विशेष शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले. या शिबिरादरम्यान तब्बल २२ व्यक्तींची शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रिया झालेल्यांमध्ये सात वर्षाखालील तीन चिमुकल्यांचा समावेश असून, जिल्हा सामान्य रुग्णालयात एकाच दिवशी २२ यशस्वी शस्त्रक्रिया करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

हर्निया, हायड्रोसील, नाभी संबंधीचा हर्निया, जन्मजात हर्निया आणि फिमोसिसची लागण झालेल्या तब्बल २६ हून अधिक गरजूंवर वेळीच शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. नीलेश जुननकर यांना मिळाली. त्यानंतर अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल वानखेडे व डॉ. प्रवीण धाकटे यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली. सामाजिक बांधिलकी जोपासत डॉ. जुननकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर शनिवारी प्रत्यक्ष हे विशेष शस्त्रक्रिया शिबिर पार पडले. या शिबिरादरम्यान डॉ. नीलेश जुननकर यांच्यासह डॉ. घनश्याम चुडे, डॉ. बुटानी, डॉ. संदीप हटवार, डॉ. प्रसाद बन्सोड, डॉ. अमित पुजारी यांनी तब्बल २२ रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया केली. त्यांना डॉ. विनोद कुरवले, डॉ. कपिल चव्हाण, डॉ. आशुतोष बाभुळकर यांच्यासह जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here