क्षुल्लक वाद भोवला अन् शुभमने आशिषची हत्या करून काटा काढला! थरारक घटनेने स्टेशन फैल हादरले; बाप-लेकासह मावस भावास ठोकल्या बेड्या

वर्धा : वडिलांशी वाद का घातला, याचा जाब विचारण्यास गेलेल्या अवघ्या २७ वर्षीय युवकाला दगडाने ठेचून तसेच मानेवर धारदार शस्त्राने वार करीत हत्या करण्यात आल्याची घटना शहरातील स्टेशनफैल परिसरात ३१ मे रोजी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेने स्टेशनफैल परिसर चांगलाच हादरून गेला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी बाप-लेकासह त्याच्या मावस भावाला रात्रीच बेड्या ठोकल्या. आशिष आनंद रणधीर (२७, रा. स्टेशनफैल) असे मृत युवकाचे नाव आहे. तर पोलिसांनी याप्रकरणात शुभम जयस्वाल (२७), वडील लक्ष्मीनारायण जयस्वाल (६४) आणि आदित्य जयस्वाल यांना अटक केल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप यांनी दिली.

मृत आशिष रणधीर आणि आरोपी शुभम जयस्वाल हे दोघेही एकाच परिसरातील रहिवासी असून अगदी काही अंतरावर दोघांचीही घरे आहेत. मृत आशिषचे वडील आनंद रणधीर यांचा ३१ मे रोजी सकाळच्या सुमारास आरोपी शुभम जयस्वाल याच्याशी वाद झाला होता. दऱम्यान, आशिषने मध्यस्थी केली असता तोंडी वाद झाला होता. रात्री ९ वाजण्याच्या सुमारास मृत आशिष हा घरासमोरील चौकात गेला असता तेथे पुन्हा आरोपी शुभमने वाद घातला. वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. अन् संतापलेल्या शुभम जयस्वाल याने काठीने मारहाण करणे सुरू केले. तेवढ्यातच शुभमचे वडील लक्ष्मीनारायण तेथे आले आणि त्यांनीही मारहाण करण्यास सुरुवात केली.

मृत आशिषला जमिनीवर पाडून त्याच्यावर दगडाने प्रहार केला. त्यानंतर चक्क धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून तेथून पळ काढला. रक्तबंबाळ अवस्थेत आशिष जमिनीवर निपचित पडून होता. त्याच्या दोन मित्रांनी त्याला दुचाकीवर बसवून सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालय गाठले. मात्र, उपचार करण्यापूर्वीच त्याने श्वास सोडला. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप, पोलीस निरीक्षक सत्यवीर बंडीवार या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पंचनामा करून प्रकरण जाणून घेत रात्रीच तिन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या. आरोपींविरुद्ध जातीवाचक शिवीगाळ आणि खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here