गॅस लीक झाल्याने भीषण आग! महिला गंभीर जखमी; लाखोचे नुकसान

वर्धा : गिरड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आर्वी गावात गॅस सिलिंडरच्या पाईपमधून गॅस लीक होऊन लागलेल्या आगीत घराची राखरांगोळी झाली. या आगीत एक महिला जखमी झाली. ही घटना गुरुवारी १२ सकाळी ७ वाजता घडली. या आगीत पूर्णतः घर जळून खाक झाल्याने दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. आर्वी येथील संजय चौके यांच्या घरातील जीवनपयोगी वस्तू सह शेतातील धान्य जळून खाक झाल्याने कुटुंबं उघड्यावर आले आहे.

संजय चौके यांच्या पत्नी सकाळी गॅसवर चहा करायला गेली दरम्यान गॅस सुरू करताना रेग्युलेटर नळीतून गँस लीक झाल्याने पेट घेतला आणि महिलेच्या अंगावरील वस्त्र पेटल्याने दुर्गा चौके जळाल्याने गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचार्थ गिरड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून सेवाग्रामच्या कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले. गावकऱ्यांना आगीचे लोंढे दिसताच संपूर्ण गावातील नागरिकांनी घराकडे धाव घेतली. आगीला नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला. गावात नळ योजना कार्यान्वित असून अपुरे पाणी प्रत्येकाकडे उपलब्ध असल्याने घराघरातून पाणी आणून गावकऱ्यांनी आग विझवली.मात्र गावकऱ्यांच्या डोळ्यासमोर या आगीत संपूर्ण घराची राख झाली.

संजय चौके अल्पभूधारक शेतकरी असल्याने जोड व्यावसाय करून कुटुंबाचा गाडा चालवीत होता. दोन दिवसांपूर्वी पन्नास हजार रुपये किमतीचे विक्रीसाठी कपडे आणले होते.ज ळून खाक झाले. दुर्गा चौके गावातील बचत समुहाच्या प्रेरिका असल्याने बचत समूहाची मासिक बचत पन्नास हजार रुपये रक्कम कपाटात होती. तर संजय चौके यांनी तूर विक्रीतून मिळालेले पन्नास हजार रुपये आणि एक लाख रुपये किमतीचे दागिने, कपडे कपाटात ठेवले होते. तर २० किंटल कापूस, तुरी, चणा, गहू, तांदूळ, अन्य धान्य या आगीत भस्मसात झाले. रोजच्या वापरातील कपडे, भांडे संपूर्णता घरातील लाकडी, लोखंडी साहित्य जळून कोळसा झाल्याने त्यांचे दहा लाखांचे नुकसान झाले. या आगीने संपूर्ण चौके कुटुंबाच्या स्वप्नांची राखरांगोळी केल्याने हे उघड्यावर आले आहे. नुकसानाचा पंचनामा करून शासनाने चौके कुटुंबियांची तातडीने मदत करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here