जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल! गंभीर दुखापत करणाऱ्या पतीस दहा वर्षांचा कारावास; आरोपी घ्यायचा पीडितेच्या चारित्र्यावर संशय

वर्धा : चारित्र्यावर संशय घेत पीडितेच्या गुप्तांगात इंजेक्शनने ॲसिड टाकून तिला गंभीर दुखापत करणाऱ्या आरोपी पतीस जिल्हा न्यायाधीश-२ आर. व्ही. आदोने यांनी दहा वर्षांच्या सश्रम कारावासासह दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

शिक्षेस पात्र ठरलेला आरोपी हा वर्धा शहराशेजारील सावंगी (मेघे) भागातील समतानगर येथील रहिवासी आहे. त्याला न्यायाधीश आदोने यांनी भादंविच्या कलम ३२५ (अ) अन्वये दहा वर्षांचा साधा कारावास तसेच कलम ५०६ (२) नुसार तीन वर्षांचा सश्रम कारावास व ३ हजार दंड तसेच दंड न भरल्यास अतिरिक्त तीन महिन्याचा साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली. या प्रकरणाचा न्याय निर्वाळा करताना न्यायाधीशांनी फौजदारी कलम ३५७ (१) नुसार पीडितेला नुकसान भरपाई म्हणून दहा हजार रुपये देण्याचे आदेशित केले आहे.

महिला अधिकाऱ्यांनी केला तपास

या प्रकरणी पीडितेने सेवाग्राम पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविताच पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्ह्याची नोंद घेतली. सेवाग्राम पोलीस स्टेशनमधील तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक सुषमा सुरेश बिसंदरे यांनी या प्रकरणाचा तपास पूर्ण करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले.

आरोपी निर्दयीच

आरोपी याने घटनेच्या दिवशी पीडितेशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. पण निर्दयी आरोपीने विकृत मानसिकतेचा कळस गाठत पीडिताच्या गुप्तांगात इंजेक्शनने ॲसिड टाकून तिला गंभीर दुखापत केली. आरोपी इतक्यावरच थांबला नाही तर त्याने घटनेबाबत कोणाला सांगितले तर जीवानिशी ठार करण्याची धमकी पीडितेला दिली.

नऊ साक्षीदारांची तपासली साक्ष

ॲड. विनय आर. घुडे यांनी न्यायालयात शासकीय बाजू मांडली. त्यांना पैरवी अधिकारी म्हणून सहायक पोलीस उपनिरीक्षक दिगांबर गांजरे यांनी सहकार्य केले. या प्रकरणात न्यायालयात एकूण नऊ व्यक्तींची साक्ष तपासण्यात आली.

सरकारी वकीलांचा युक्तिवाद ठरला मोलाचा

फिर्यादी तसेच इतर साक्षीदार यांची साक्ष तसेच इंजेक्शनमधील वापरण्यात आलेले सल्फरिक ॲसिड व आरोपीचे दाखविल्यावरून जप्त करण्यात आलेले सल्फरिक ॲसिड हे एकच असल्याचा रासायनिक विश्लेषण अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला. या विषयी न्यायालयात जिल्हा सरकारी वकील ॲड. गिरीश तकवाले यांनी युक्तिवाद केला. हाच मुद्देसूद युक्तिवाद आरोपीला शिक्षेस पात्र ठरण्यासाठी मोलाचा ठरला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here