जिल्ह्यातील व्यावसायिक दुकाने आता रात्री ८ वाजेपर्यंत राहणार सुरू

वर्धा : जिल्ह्यात सध्या नवीन कोविड बाधित सापडण्याची गती बऱ्यापैकी मंदावली आहे. परिणामी राज्य शासनाच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेवून जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी मंगळवारी आदेश निर्गमित करून जिल्ह्यातील व्यावसायिक प्रतिष्ठाने रात्री ८ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये सर्व अत्यावश्‍यक वस्तू व बिगर अत्यावश्यक सेवेची दुकाने सोमवार ते शुक्रवार या काळात रात्री ८ वाजेपर्यंत तर शनिवारी दुपारी 3 वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहेत. तसेच रविवारी सर्व दुकाने व मॉल्स (अत्यावश्‍यक सेवा वगळता) पूर्णपणे बंद राहणार आहे. सार्वजनिक उद्याने व क्रीडांगणे, बगिचे मॉर्निंग व इव्हिनिंग वॉक तसेच सायकलिंगसाठी पूर्णपणे सुरू राहणार आहेत.

व्यायामशाळा, योग केंद्र, हेअर कटिंग सळून, ब्यूटिपार्लर, स्पा सोमवार ते शुक्रवार रात्री ८ पर्यंत ४० टक्के क्षमतेने, तर शनिवारी दुपारी 3 पर्यंत सुरू राहतील. तर रविवारी ही व्यावसायिक प्रतिष्ठाने पूर्णपणे बंद राहणार आहेत. हॉटेल, रेस्टॉरंट, खाणावळी, शिवभोजन थाळी सोमवार ते शुक्रवार दुपारी ४ पर्यंत ५० टक्के आसन क्षमतेनुसार, तर दुपारी ४ ते रात्री ९ यावेळेत केवळ पार्सल सुविधेसाठी सुरू राहतील. शनिवारी व रविवारी ही प्रतिष्ठाने केवळ पार्सल सेवेसाठीच सुरू राहणार असल्याचे आदेशात नमुद आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here