या चौकशीला मोदी का घाबरले? नाना पटोलेंचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप

मुंबई : राफेल प्रकरणावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापू लागलं आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या मुद्द्यावरून गंभीर आरोप करत चौकशीची मागणी केली आहे.

‘राफेल फायटर जेटच्या व्यवहारात मोठा घोटाळा झाल्याची बाब उघड करून काँग्रेसने या घोटाळ्याच्या चौकशीची मागणी लावून धरली होती. परंतु मोदी सरकारने हे प्रकरण चौकशीविनाच गुंडाळले. हा संपूर्ण व्यवहारच संशयास्पद असल्याने फ्रान्स सरकारने आता या राफेल घोटाळ्याच्या चौकशीला सुरुवात केली आहे. या प्रकरणात करोडो रुपयांचा घोटाळा झाला असून फ्रान्समध्ये चौकशी होऊ शकते तशी भारतातही या घोटाळ्याची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करा,’ अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.

यासंदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की, मोदी सरकारने २०१६ मध्ये फ्रांसच्या डसॉल्ट एव्हिएशन कंपनीकडून ३६ राफेल विमानांची खरेदी केली. काँग्रेसच्या काळात जे विमान ५२६ कोटी रूपयांना खरेदी करण्याचे ठरले होते. तेच विमान मोदी सरकारने १६७० कोटी रूपयांना खरेदी केले. काँग्रेस सरकारने १२३ राफेल खरेदीचा व्यवहार करत होते पण मोदी सरकारने तर ३६ राफेलचाच व्यवहार केला आणि जनतेच्या तिजोरीतून ४१ हजार २०५ कोटी रूपये अतिरिक्त मोजले. ही विमाने महाग का झाली? या व्यवहारात कोणा-कोणाचे खिसे भरले? याचे उत्तर मोदी सरकारने आजपर्यंत दिलेले नाही. डसॉल्टने भारतातील मध्यस्थाला एक दशलक्ष युरो एवढी रक्कम दिली. २०१७ मध्ये डसॉल्ट ग्रुपच्या बँक खात्यातून ‘गिफ्ट टू क्लाएंट’ म्हणून ही रक्कम ट्रान्सफर करण्यात आली होती. फ्रान्समधील भ्रष्टाचारविरोधी तपास संस्था AFA ने डसॉल्टच्या बँक खात्यांचे ऑडिट केल्यानंतर ही बाब समोर आली आहे. यावरून राफेल खरेदीत मोठा भ्रष्टाचार झाल्याचे सिद्ध झाले आहे. आज फ्रान्समध्ये राफेल घोटाळ्याची चौकशी सुरु झाली आहे, या चौकशीत फ्रान्सच्या आजी माजी राष्ट्राध्यक्षांची चौकशी होणार आहे मग भारतातच चौकशीला मोदी सरकार का घाबरत आहे?

‘मोदी सरकारची खोटी माहिती आणि दिशाभूल’

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंदुस्थान एरॉनॉटिक्स या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीला मिळणारे ३० हजार कोटींचे कंत्राट, राफेल खरेदी कराराच्या १२ दिवसापूर्वी स्थापन झालेल्या रिलायन्स डिफेन्स या खाजगी कंपनीला देऊन १ लाख कोटी रुपयांचे लाईफ सायकल कंत्राट देऊन अनिल अंबानीचा फायदा करुन दिला. राफेल लढाऊ विमान खरेदीत देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा झाला आहे. या प्रकरणी मोदी सरकारने सर्वोच्च न्यायालयात खोटी माहिती देऊन व असत्य बोलून न्यायालयाची दिशाभूलही केली आहे. सोबतच संसदेच्या विशेष अधिकाराचे उल्लंघनही केले आहे. राफेल घोटाळा हा देशाचे नुकसान करणारा, देशाची सुरक्षा धोक्यात आणणारा आहे,’ असा घणाघात नाना पटोले यांनी केला.

दरम्यान, राफेल घोटाळ्याप्रकरणी खासदार राहुल गांधी यांनी सातत्याने आवाज उठवून चौकशीची मागणी केली होती. काँग्रेस पक्षानेही या खरेदी व्यवहाराची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी केली होती. चौकशी केल्यास या प्रकरणाचे सत्य समोर येऊन खरे चोर सापडतील, असं नाना पटोले म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here