Home ◼️ संपादकीय जिल्ह्यातील सहकार चळवळ जीवंत ठेवण्यासाठी युवा पिढीने पुढे यावे – पालकमंत्री डॉ.पंकज...

जिल्ह्यातील सहकार चळवळ जीवंत ठेवण्यासाठी युवा पिढीने पुढे यावे – पालकमंत्री डॉ.पंकज भोयर

वर्धा : केंद्र शासनाने सहकार क्षेत्राच्या विकासासाठी 2021 मध्ये स्वतंत्र सहकार विभागाची स्थापना केली. या विभागाच्या माध्यमातून सहकारी संस्थाचे संपुर्ण संगणकीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. राज्यात 1 हजार 200 सहकारी संस्थाचे संगणकीकरण करण्यात येत आहे. जिल्ह्यात सहकार चळवळ मागे पडली आहे. या चळवळीला जीवंत ठेऊन तिला पुढे नेण्यासाठी युवा पिढीने पुढे यावे, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले.

गोदावरी अर्बन मल्टीस्टेट क्रेडीट को-ऑपरेटीव्ह संस्थेच्या चौथ्या वर्धापण दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला संस्थेचे संस्थापक तथा बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्राचे अध्यक्ष आमदार हेमंत पाटील, नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, अतिरिक्त पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे, गोदावरी संस्थेच्या अध्यक्ष राजश्री पाटील, व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर, वर्धा अर्बन को-ऑपरेटीव्ह बँकेचे अध्यक्ष सुधाकर साटोणे, सचिन खोसे, सचिन होले, पृथ्वीराज शिंदे, अजय देशमुख, संजय कामनापुरे आदी उपस्थित होते.

डबघाईस आलेल्या वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला राज्य शासनाच्यावतीने 168 कोटी रुपयाची ठेवी जमा करण्यात आली आहे. त्यामुळे आता रिजर्व बँकेकडे जमा असलेला परवाना बँकेला परत मिळाला आहे. त्यामुळे नागरिक, शेतकऱ्यांनी या बँकेकडे आपल्या ठेवी जमा कराव्या, असे आवाहन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले. 2013 साली सुरु करण्यात आलेल्या गोदावरी संस्थेने अल्पावधीत मोठे यश प्राप्त केले. देशातील 7 राज्यात 100 शाखा सुरु केल्या आहे. त्यांचे अनुकरण इतर सहकारी संस्थांनी करावे, असे पुढे बोलतांना डॉ.पंकज भोयर म्हणाले.

वर्धा जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर चांगल्या दर्जाचे हळद उत्पादन घेत आहे. यासाठी बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्राने वर्धा येथे उप संशोधन केंद्र सुरु करावे, अशी मागणी यावेळी पालकमंत्री डॅा.भोयर यांनी केली. यामुळे येथील हळदीची गुणवत्ता वाढून हळद उत्पादकांना चालना मिळेल व हळदीचा चांगला भाव मिळण्यास मदत होईल, असे पालकमंत्री डॉ.पंकज भोयर म्हणाले.
यावेळी राजश्री पाटील, धनंजय तांबेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाप्रसंगी पालकमंत्र्यांच्या हस्ते, खातेदार, कर्जदार, उत्कृष्ट कार्य करणाऱ्या बँक व्यवस्थापकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला बँकेचे खातेदार, नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!