Home जिल्हा वर्धा बोरधरण पर्यटनस्थळाच्या विकासाला गती ; नव्याने ४ कोटींची मंजुरी

बोरधरण पर्यटनस्थळाच्या विकासाला गती ; नव्याने ४ कोटींची मंजुरी

वर्धा : बोर धरण परिसराला पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यासाठी शासनाने नव्याने ४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. डॉ. पंकज भोयर यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या या प्रकल्पामुळे निसर्ग पर्यटनाला मोठी चालना मिळणार असून, पर्यटकांसाठी विविध सुविधा उभारल्या जात आहेत.

सेलू तालुक्यातील बोर व्याघ्र प्रकल्प हा राज्यातील महत्त्वाचा वनक्षेत्र असून येथे वर्षभर देशभरातून पर्यटक वाघ दर्शनासाठी येत असतात. या व्याघ्र प्रकल्पाच्या मधोमध वसलेले बोर धरण निसर्गरम्य वातावरणामुळे विशेष आकर्षण ठरत आहे. या परिसराचा पर्यटनस्थळ म्हणून विकास केल्यास पर्यटकांना ‘व्याघ्र दर्शन’ आणि ‘निसर्ग पर्यटन’ असा दुहेरी अनुभव मिळणार आहे.

पर्यटनस्थळाच्या विकासासाठी आतापर्यंत सुमारे १० कोटी २३ लाख रुपयांची विविध कामे मंजूर करण्यात आली आहेत. त्यामध्ये सफारीसाठी वाहनांची व्यवस्था, गेट विकास, पर्यटकांसाठी सुविधा केंद्र, तसेच बोटींगसाठी जेटी उभारणी यांचा समावेश आहे. बोरधरण परिसरात पॉलीकार्बोनेट शेड, सीएनसी गेट, तसेच पर्यटनासाठी आवश्यक मूलभूत सुविधा उभारण्याचे काम सुरू आहे.

विशेष म्हणजे, पर्यटकांना बोटींगचा आनंद घेता यावा यासाठी धरणावर जेटी उभारण्यात येत असून, तेथे जाण्यासाठी सुरक्षित मार्गही तयार केला जात आहे. तसेच बोरधरण येथील रिसॉर्टचा देखील विकास करण्यात येत आहे. यामध्ये व्हीआयपी सूट, मिटिंग हॉल, वसतिगृह, डिलक्स खोल्या, फर्निचर, इंटेरियर आणि विद्युत कामांचा समावेश आहे.

दरम्यान, पर्यटकांची संख्या वाढविण्यासाठी बोर व्याघ्र प्रकल्पात राहाटी आणि ढगा ही नवीन प्रवेशद्वारे सुरू करण्यात आली असून, बोरधरण निसर्ग सफारी गेटवरून पर्यटकांना सफारीसाठी वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत बोरधरण परिसराचे सौंदर्यीकरण आणि सोलर लाईटद्वारे विद्युतीकरणासाठी नव्याने ४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या सर्व कामांमुळे बोरधरण हे भविष्यात राज्यातील एक महत्त्वाचे पर्यटनस्थळ म्हणून उदयास येणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

याबाबत बोलताना डॉ. पंकज भोयर म्हणाले, बोरधरण हे निसर्गाच्या कुशीत वसलेले अत्यंत सुंदर स्थळ आहे. व्याघ्र प्रकल्पासोबतच येथे पर्यटनाच्या विविध सुविधा उपलब्ध करून दिल्यास जिल्ह्यातील पर्यटनाला मोठी चालना मिळेल. या माध्यमातून स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधीही निर्माण होतील. या प्रकल्पामुळे वर्धा जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्राला नवे आयाम मिळणार असून, निसर्ग पर्यटन, वन्यजीव अनुभव आणि स्थानिक रोजगारनिर्मिती यांचा समन्वय साधणारे बोरधरण भविष्यात पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!