

पवनार : पवनार-सुरगाव परिसरातील शेतकऱ्यांनी यंदा मोठ्या अपेक्षेने टोमॅटोची लागवड केली असली, तरी वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे या पिकाला मोठा फटका बसत असल्याचे चित्र समोर येत आहे. सुरुवातीला चांगल्या उत्पन्नाची आशा बाळगणाऱ्या शेतकऱ्यांना आता उत्पादन घटल्याने आर्थिक गणित कोलमडण्याची भीती निर्माण झाली आहे.
या भागातील अनेक शेतकऱ्यांनी सुमारे सव्वा एकर क्षेत्रात टोमॅटोची लागवड केली आहे. बी-बियाणे, खत, औषधे, मजुरी, पाणी व्यवस्थापन यासाठी जवळपास एक लाख रुपयांपर्यंत खर्च झाला आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उन्हाच्या तडाख्यामुळे टोमॅटोचे उत्पादन कमी होऊ लागले आहे. फळधारणा कमी होणे, झाडे कोमेजणे आणि उत्पादन घटणे यामुळे शेतकरी चिंतेत सापडले आहेत.
यापूर्वी बाजारात टोमॅटोची आवक मोठ्या प्रमाणात असल्याने भाव फारसा मिळत नव्हता. त्या वेळी उत्पादन जास्त असल्यामुळे काही प्रमाणात तोटा सहन करता आला. मात्र, आता उन्हामुळे मालाची आवक कमी होत असतानाही भावात अपेक्षित वाढ होत नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान वाढण्याची शक्यता आहे. सव्वा एकरात टोमॅटो लावला आहे. जवळपास एक लाख रुपयांचा खर्च झाला. आता उन्हामुळे उत्पादन घटत आहे. बाजारात भावही समाधानकारक नाहीत. खर्च निघून किती नफा होईल, हे सांगता येत नाही, अशी प्रतिक्रिया सुरगाव येथील युवा शेतकरी मंगेश वानखेडे यांनी दैनिक सकाळची बोलताना दिली.
तापमानातील अचानक वाढ आणि पाण्याची कमतरता यामुळे टोमॅटो पिकावर परिणाम होत आहे. योग्य सिंचन व्यवस्थापन, सावली जाळी (शेडनेट) आणि कीड-रोग नियंत्रण यावर भर देण्याची गरज असल्याचेही सांगितले जात आहे. दरम्यान, प्रशासनाने या परिस्थितीकडे लक्ष देत शेतकऱ्यांना मार्गदर्शन व आवश्यक मदत देण्याची मागणी होत आहे. अन्यथा, आधीच वाढत्या खर्चामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना आणखी आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो.
खर्च जास्त, उत्पन्न अनिश्चित….
पवनार-सुरगाव परिसरातील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना वाढत्या तापमानाचा फटका बसत आहे. सव्वा एकर क्षेत्रात लागवडीसाठी सुमारे एक लाख रुपयांपर्यंत खर्च झाला आहे. मात्र, उत्पादन घट आणि बाजारातील कमी भाव यामुळे नफा अनिश्चित झाला आहे. आवक कमी असूनही दरात वाढ होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे.




























































