

राहुल खोब्रागडे
वर्धा : जिल्ह्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या तीव्र टंचाईने नागरिकांचे जगणे अक्षरशः होरपळून निघत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या युद्धपरिस्थितीमुळे इंधन पुरवठ्यावर परिणाम झाल्याचे सांगितले जात असले, तरी स्थानिक पातळीवरील नियोजनाचा अभाव आणि धोरणात्मक त्रुटींमुळे ही समस्या अधिकच गंभीर बनल्याची चर्चा सर्वत्र रंगू लागली आहे.
अनेक ग्राहकांनी १५ ते २० दिवसांपूर्वी बुकिंग करूनही गॅस सिलेंडर मिळत नसल्याने महिलांचे हाल अपरंपार वाढले आहेत. शहरांमध्ये काही प्रमाणात पुरवठा होत असला, तरी ग्रामीण भागात परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. अनेक कुटुंबांना पुन्हा पारंपरिक चुलीचा आधार घ्यावा लागत असून, धूर आणि आरोग्याच्या समस्या पुन्हा डोके वर काढत आहेत.
गॅस सिलेंडर न मिळाल्यामुळे दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम होत आहे. घरगुती स्वयंपाक विस्कळीत झाला असून, वेळेवर जेवण न मिळणे, मुलांच्या डब्यांचा प्रश्न, कामावर जाणाऱ्या कुटुंबीयांची गैरसोय अशा अनेक अडचणी निर्माण होत आहेत. काही कुटुंबांना बाहेरचे अन्न घेण्याची वेळ येत असून त्यामुळे आर्थिक भार वाढत आहे. ग्रामीण भागात लाकूडफाटा गोळा करण्यासाठी महिलांना अतिरिक्त श्रम करावे लागत आहेत, तर धुरामुळे डोळे व श्वसनाचे त्रास वाढत असल्याचेही दिसून येत आहे.
गॅस एजन्सीकडून पुरवठा सुरळीत होईल अशी आश्वासने दिली जात असली, तरी प्रत्यक्षात नागरिकांना वारंवार एजन्सीच्या चकरा माराव्या लागत आहेत. ऑनलाईन बुकिंग, हेल्पलाईन आणि तक्रारी करूनही कोणताही ठोस प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार वाढत आहे. परिणामी, सर्वसामान्य नागरिकांमध्ये असंतोष वाढताना दिसत आहे.
यातच अलीकडील गॅस दरवाढीने परिस्थिती अधिकच चिघळली आहे. आधीच महागाईच्या झळा सहन करणाऱ्या नागरिकांना वाढीव दरात सिलेंडर घेणे परवडत नसल्याचे चित्र आहे. ना वेळेत गॅस, ना परवडणारा दर अशी दुहेरी कोंडी नागरिकांवर आली आहे.
पुरवठा साखळीतील अडथळे, वितरणातील विस्कळीतपणा आणि मागणी-पुरवठ्याचा ताळमेळ न राखल्याने ही परिस्थिती उद्भवल्याचे जाणकारांचे मत आहे. युद्धपरिस्थितीचा परिणाम नाकारता येत नसला, तरी त्याचा योग्य वेळी अंदाज घेऊन नियोजन करण्यात शासन अपयशी ठरल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
धोरणांवर सवाल, नागरिक त्रस्त…
गॅस सिलेंडरची टंचाई ही केवळ जागतिक परिस्थितीचा परिणाम नसून, स्थानिक पातळीवरील नियोजनातील त्रुटींचेही द्योतक असल्याची चर्चा आहे. वेळेत पुरवठा न होणे, वितरणातील गोंधळ आणि वाढते दर यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. सिलेंडर न मिळाल्याने स्वयंपाक, दैनंदिन जीवन आणि आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून, महिलांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. युद्धाचे कारण सांगून जबाबदारी टाळू नये सरकारने ठोस उपाययोजना करून तातडीने परिस्थिती सुधारावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
प्रतिक्रिया…
गॅससारख्या मूलभूत गरजेची अशी अवस्था होणे लाजिरवाणे आहे. १५ ते २० दिवसपासून बुकिंग करूनही सिलेंडर मिळत नाही, हे कोणत्या प्रशासनाचे लक्षण आहे? दरवाढ करून सरकारने आमच्या अडचणी अजून वाढवल्या आहेत. सर्व कामधंदे सोडून तासानतास लाईन मध्ये लागून सिलेंडर घेण्यासाठी धडपड करावे लागत आहे.
लवेश भुजाडे, युवक पवनार
मागणीच्या तुलनेत सिलेंडर कमी मिळत असल्याने सर्व ग्राहकांना तत्काळ पुरवठा करणे शक्य होत नाही. तरीही उपलब्ध स्टॉकनुसार प्राधान्याने वितरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अनेक ग्राहक गरजेपेक्षा जास्त गॅस सिलेंडर भरून घेत आहेत त्यामुळे ही अडचण वाढत आहे. परिस्थिती लवकरच सुरळीत होईल, असा विश्वास आहे.
सुनील झाडे, गॅस वितरक पवनार


























































