Home ◼️ संपादकीय वर्ध्यात विद्युत डीपीला आग ; निर्मल बेकरी चौकातील घटना ! अग्निशामक दलाच्या...

वर्ध्यात विद्युत डीपीला आग ; निर्मल बेकरी चौकातील घटना ! अग्निशामक दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला

वर्धा : शहरातील गजबजलेल्या निर्मल बेकरी चौक परिसरात सोमवारी सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास विद्युत वितरण कंपनीच्या डीपीला अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. डीपीमधून धूर आणि ज्वाळा बाहेर पडू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ महावितरणच्या अधिकाऱ्यांना कळविले. माहिती मिळताच महावितरणचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन अग्निशामक विभागालाही पाचारण करण्यात आले. अग्निशामक दलाचे वाहन काही वेळातच घटनास्थळी पोहोचले आणि जवानांनी तत्काळ आग विझविण्याचे काम सुरू केले. वेळीच नियंत्रण मिळवल्यामुळे आग इतरत्र पसरण्यापासून रोखण्यात यश आले.

निर्मल बेकरी चौक परिसरात अनेक कापड दुकाने, व्यावसायिक आस्थापने तसेच इतर दुकाने एकमेकांना लागून असल्याने आग वाढल्यास मोठी वित्तहानी होण्याची शक्यता होती. मात्र, महावितरण कर्मचारी आणि अग्निशामक दलाच्या तातडीच्या कारवाईमुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला. या घटनेत कोणतीही हानी झाली नसून आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. महावितरणकडून याबाबत अधिक तपास सुरू आहे.

वेळीच मिळाली माहिती, मोठी दुर्घटना टळली

डीपीला आग लागल्याचे लक्षात येताच नागरिकांनी प्रसंगावधान राखून त्वरित महावितरण आणि अग्निशामक विभागाला माहिती दिली. संबंधित यंत्रणांनीही तत्परता दाखवत तात्काळ घटनास्थळी धाव घेतल्याने आग आटोक्यात आली आणि परिसरातील व्यापारी व नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!