
वर्धा : रस्त्यावरील वाढती वाहतूक, बदलती परिस्थिती आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेची जबाबदारी सांभाळत तब्बल २५ वर्षे अपघातमुक्त सेवा बजावणाऱ्या एसटीच्या दोन चालकांचा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त सपत्नीक सत्कार करण्यात आला.
वर्धा विभागात आयोजित कार्यक्रमात हिंगणघाट आगाराचे चालक शंकर गिरी आणि आर्वी आगाराचे चालक संजय करंडकार यांचा मान्यवरांच्या हस्ते अपघातमुक्त सेवेचा बिल्ला प्रदान करून गौरव करण्यात आला. सुरक्षित आणि जबाबदार वाहनचालनाच्या माध्यमातून प्रवाशांच्या जीविताचे रक्षण करणाऱ्या या चालकांचे उपस्थितांनी कौतुक केले.
कार्यक्रमाला यंत्र अभियंता प्रताप राठोड, विभागीय वाहतूक अधिकारी स्वाती तांबे, विभागीय लेखाकार वसंत खिराडे, पत्रकार सुरेंद्र रामटेके, बसस्थानक प्रमुख नंदकिशोर मसराम, विभागीय भांडार अधीक्षक येवतकर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांनी मार्गदर्शन करताना सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आणि वाढत्या वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर एसटीची सुरक्षित सेवा किती महत्त्वाची आहे, यावर प्रकाश टाकला. अपघातमुक्त सेवा देणाऱ्या चालकांचे अनुकरण करून इतर चालकांनीही सुरक्षित वाहनचालनाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वाती तांबे यांनी केले. सूत्रसंचालन संजय नरांजे यांनी केले, तर आभार नंदकिशोर मसराम यांनी मानले. कार्यक्रमाला अल्केश वरघणे, प्रशांत बोडखे, शिवा गावंडे, संजय सदार, संजय तळोकार, प्रवीण बद्रे, योगेश गंथाडे, विशाल बडगे, रोहित सांबरे, अर्चना मेंढे, मनिका शर्मा, सुजाता नगराळे यांच्यासह महामंडळाचे कर्मचारी, चालक व वाहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुरक्षित सेवेला सलाम…
दररोज हजारो प्रवाशांना सुरक्षितपणे त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचविणाऱ्या एसटी चालकांवर मोठी जबाबदारी असते. अशा परिस्थितीत सलग २५ वर्षे अपघातमुक्त सेवा देणे ही उल्लेखनीय कामगिरी मानली जात असून, या चालकांचा गौरव इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.


























































