कपाशीच्या पिकात लपविला होता मृतदेह! तपासात उलगडले वास्तव; चिस्तूर येथील हत्या प्रकरण

तळेगाव (श्या.पंत) : पहिले गुप्तांगावर प्रहार, तर नंतर काठीने जबर मारहाण करून चिस्तूर येथील गो-पालक रमेश नारायण वावरे यांची हत्या केल्यावर तिन्ही आरोपींनी संगनमत करून रमेशचा मृतदेह कुणालाही सहज दिसू नये या उद्देशाने थेट कपाशीच्या पिकात लपविल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे. शेळ्या मारल्याचा संशय मनात ठेवून चिस्तूर येथील निलेश चौधरी याने ध्रुवपाल सरोदे व सुरेश चौधरी याला सोबत घेत रमेशच्या हत्येचा नियोजनबद्ध कट रचला.

तिन्ही आरोपींनी २२ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास शरद मडधे यांच्या शेतापासून काही अंतरावर असलेल्या पायवाटेवर रमेशला वाटेत अडविले. तेथेच या तिघांनी सुरुवातीला गुप्तांगावर, तर नंतर काठीने जबर मारहाण करून रमेशची हत्या केली; पण रमेशचा मृतदेह कुणालाही सहज मिळू नये म्हणून या तिन्ही आरोपींनी घटनास्थळावरील मृतदेह उचलून मडघे यांच्या शेतातील कपाशीच्या पिकात लपविला. इतकेच नव्हे तर त्यानंतर हे तिन्ही आरोपी नागरिकांत मिसळून काही झालेच नाही असे वागू लागल्याने त्यांच्यावर सुरुवातीला कुणालाही शंका आली नाही; पण रमेशच्या पत्नीने पती रमेश घरी न परतल्याने आपल्या विवाहित मुलीला २३ एप्रिलला माहिती दिली. त्यानंतर रमेशच्या मुलीने २४ एप्रिलला पोलीस स्टेशन गाठून रमेश वावरे हे बेपत्ता असल्याची तक्रार तळेगाव पोलिसांत नोंदविली. तक्रार प्राप्त झाल्यावर पोलिसांनीही आपल्या हालचालींना गती दिली. दरम्यान, मडघे यांच्या शेतात रमेशचा मृतदेह सापडला. त्यानंतर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे या प्रकरणातील तिन्ही आरोपींना ताब्यात घेत गुन्ह्याची उकल केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here