Home ◼️ संपादकीय अवैध दारू व्यवसायावर पोलिसांचा घाव ; दारूच्या ७ भट्ट्या उद्ध्वस्त !...

अवैध दारू व्यवसायावर पोलिसांचा घाव ; दारूच्या ७ भट्ट्या उद्ध्वस्त ! १८.४२ लाखांचा मुद्देमाल जप्त

वर्धा : जिल्ह्यातील अवैध दारू व्यवसायाविरोधात वर्धा पोलिसांनी मोठी कारवाई करत सावंगी (मेघे) पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शिख बेडा परिसरात धडक ‘वॉशआऊट मोहीम’ राबविली. या कारवाईत अवैध दारू निर्मितीच्या सात भट्ट्या उद्ध्वस्त करण्यात आल्या असून तब्बल १८ लाख ४२ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच घरात लपवून ठेवलेला एक मोठा चाकूही हस्तगत करण्यात आला आहे.

पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) व दंगल नियंत्रण पथकाने संयुक्तपणे सोमवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास शिख बेडा परिसरात सर्चिंग ऑपरेशन सुरू केले. या धडक मोहिमेत गावठी दारू निर्मिती करणाऱ्या भट्ट्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली.

कारवाईदरम्यान दारूबंदी कायद्यान्वये सात गुन्हे दाखल करण्यात आले असून सात आरोपींविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. पोलिसांनी मोठ्या प्रमाणात गावठी दारू निर्मितीसाठी वापरले जाणारे रसायन, साहित्य व इतर सामग्री जप्त केली. प्रयोगशाळा परीक्षणासाठी आवश्यक नमुने घेण्यात आले असून उर्वरित मुद्देमाल जागीच नष्ट करण्यात आला.

सर्चिंगदरम्यान घरात लपवून ठेवलेला एक मोठा चाकू पोलिसांच्या हाती लागला. याप्रकरणी संबंधित आरोपीविरुद्ध भारतीय हत्यार कायद्यान्वये (Arms Act) स्वतंत्र गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेसाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. एकूण ७७ अधिकारी व कर्मचारी या ऑपरेशनमध्ये सहभागी झाले होते. नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यात आलेल्या या कारवाईमुळे परिसरातील अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

या कारवाईत अपर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद चौधरी, सावंगी (मेघे) पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विनोद गिरी तसेच एलसीबी आणि दंगल नियंत्रण पथकातील अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी जिल्ह्यातील अवैध दारू, अमली पदार्थ व इतर बेकायदेशीर धंद्यांविरोधातील अशा प्रकारच्या शोध मोहिमा यापुढेही अधिक तीव्रतेने सुरू राहतील, असा इशारा दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!