सहा वर्षीय बालकाशी अनैसर्गिक कृत्य! पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल; मौलाना जेरबंद: रामनगर हद्दीतील घटनेने खळबळ

वर्धा : सहा वर्षीय बालकाशी अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या मौलानाला रामनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ही घटना मंगळवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. या प्रकरणी पीडित बालकाच्या आई-वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी मौलानाला अटक करण्यात आली आहे. समीउल्ला खान वल्क अब्दुल हमीद खान (२५, रा. वर्धा) असे अटक केलेल्या मौलानाचे नाव आहे.

मौलाना समीउल्ला खान याचे शिक्षण जामिया इस्लामिया अरबी मदरसा, सुरत येथून पूर्ण झाले असून, मागील दोन वर्षांपासून तो वर्ध्यात वास्तव्यास आहे. मंगळवारी सकाळच्या सुमारास आरोपी समीउल्ला याने सहा वर्षीय बालकाशी अनैसर्गिक कृत्य केले. बालकाने याची माहिती थेट त्याच्या आईला सांगितली. बालकाच्या आईने आर्वी नाका चौकात बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना ही बाब सांगितली.

पोलिसांनी तत्काळ त्यांना रामनगर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार देण्याचा सल्ला दिला. पीडित बालकाच्या आईने रामनगर ठाण्यात तक्रार नोंदविली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी मौलाना असलेल्या आरोपी समीउल्ला खान वल्क अब्दुल हमीद खान याला अटक केली. पुढील तपास रामनगर पोलीस ठाण्याचे ठाणेदार हेमंत चांदेवार करीत आहेत.

‘असरा’ फाऊंडेशनतर्फे घटनेचा निषेध

रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या घटनेचा असरा फाऊंडेशन कमिटी, वर्धा आणि जिल्हा मुस्लिम संघटनेच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला आहे. अशा कुठल्याही कृत्याला आम्ही व आमचा समाज कदापी समर्थन देणार नाही. झालेल्या घटनेचा तीव्र निषेध करीत आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, हीच आमची मागणी असल्याचे निवेदन असरा फाऊंडेशनचे अध्यक्ष सय्यद उमर अली यांनी पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांना दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here