

वर्धा : तब्बल चार वर्षांपासून पोटच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम पित्याविरुद्ध सेवाग्राम पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी नराधमास अटक करुन त्याची कारागृहात रवानगी केली आहे. ही घटना बापलेकाच्या नात्याला काळिमा फासणारी असून या घटनेने जनमाणसांत संतापाची लाट उसळली आहे.
प्राप्त माहितीनुसार पीडितेचे वडील हे सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरीवर असून आई यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील रुग्णालयात परिचारिका म्हणून सेवा देत आहे. सर्व कुटुंब यवतमाळ येथे राहायचे. नराधम बापाची नोकरी वर्ध्याला असल्याने ते अपडाऊन करायचे. १० जुलै २०१७ मध्ये पीडिता घरी एकटी असताना बापाने तिच्याशी लैंगिक संबंध प्रस्थापित केले. याबाबतची माहिती पीडितेने तिच्या मावशीजवळ सांगितली होती. मावशीने ही बाब पीडितेच्या आईलाही सांगितली होती; मात्र पीडितेच्या आईने याकडे दुर्लक्ष केले; मात्र त्यानंतर देखील नराधम बापाने पीडितेवर वारंवार अत्याचार करुन तिचा लैंगिक छळ सुरुच ठेवला.
वर्षभराने पीडिता कुटुंबासह सेवाग्राम पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहण्यास आली. तेथेही तिच्यावर वडिलांनी अत्याचार केला. नराधमाने ही बाब कुणालाही सांगितल्यास शिक्षण बंद करुन देण्याची धमकी दिल्याने पीडितेने ही बाब कुणालाही सांगितली नाही. अखेर पीडितेने ही बाब तिच्या मैत्रिणींना सांगितली. मैत्रिणीने तिच्या आईजवळ माहिती दिल्यावर एका एनजीओने याची दखल घेत पीडितेसह थेट सेवाग्राम पोलीस ठाणे गाठून याची तक्रार दिली पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तत्काळ आरोपी नराधम बापास अटक करुन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी केली. या घटनेने समाजमन सुन्न झाले असून नात्याला काळिमा फासणाऱ्या घटनेने समाजमन देखील सुन्न पडले.