पोहण्याचा नाद बेतला जिवावर! नववीचे शिक्षण घेणाऱ्या दोघांचा बुडून अंत

आर्वी : ‘मी खेळायला जातोय’ असे सांगून घराबाहेर पडलेल्या दोन युवकांनी थेट शेतातील विहीर गाठली. याच विहिरीत पोहण्यासाठी उतरलेल्या दोघांचा बुडून मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घटना रविवारी सकाळी नजीकच्या शहापूर शिवारात उघडकीस आली असून देवांशू नीलेश घोडमारे (१४) रा. आसोलेनगर व युगंधर धर्मपाल मानकर (१५) रा. साईनगर अशी मृत युवकांची नावे असून, हे दोघेही तपस्या इंग्लिश स्कूलमध्ये नववीचे शिक्षण घेत होते.

खेळायला जातो, असे सांगून घराबाहेर पडलेले, रात्री उशीर होऊनही घरी न परतल्याने कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला. पण ते न मिळाल्याने पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांकडूनही मुलांचा शोध घेतला जात असतानाच रविवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास शहापूर शिवारात शेतात काम करीत असलेले मजूर विहिरीवर पाणी पिण्यासाठी गेले असता त्यांना विहिरीत मृतदेह असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून परिसरातील नागरिकांच्या मदतीने मृतदेह विहिरीबाहेर काढून मृतांची ओळख पटविली. तेव्हा ते दोघेही तपस्या इंग्लिश स्कूलमधील नववीचे विद्यार्थी असल्याचे पुढे आले. मृतकांची ओळख पटल्यावर पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले. या प्रकरणी आर्वी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here