भूमिहीन झाल्यावर गृहरक्षक म्हणून दिली सेवा! ‘शुभांगी’ ठरली जिल्ह्यातील पहिली लालपरी चालक

आर्वी : सध्याच्या विज्ञान युगातही पुरुषांच्या तुलनेत महिला कुठेही कमी नसल्याचे आर्वी तालुक्यातील भादोड येथील शुभांगी गाडगे हिने दाखवून दिले आहे. शुभांगी हिने जिल्ह्यातील पहिली लालपरी चालक होण्याचा बहुमान पटकाविला आहे. विशेष म्हणजे भूमिहीन झाल्यावर तिने व तिच्या पतीने सुरुवातीला गृहरक्षक दलात सेवा दिली.

महाराष्ट्र शासनाने राज्यातील होतकरू महिलांना राज्य परिवहन महामंडळात महिला चालक म्हणून काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली. याच संधीचे सोने करीत शुभांगी हिने जिल्ह्यातील रापमची पहिली महिला बस चालक होण्याचा बहुमान पटकाविला आहे. राज्यातील १६० महिला चालकांमध्ये वर्धा जिल्ह्याच्या आर्वी तालुक्यातील भाडोद येथील शुभांगी गाडगे हिचा समावेश असून आता तिने प्रत्येक प्रवाशाला नियोजित ठिकाणी सुरक्षित पोहोचविण्याचा विडाच उचलला आहे. सध्या ती राज्य परिवहन महामंडळाकडून बस चालविण्याचे प्रशिक्षण घेत असून लवकरच ती प्रत्यक्ष सेवा देणार असल्याचे सांगण्यात आले.

विविध विभागांच्या परीक्षा देत वाढविला आत्मविश्वास

वाहन चालक व वाहकाचे प्रशिक्षण घेतल्यावर चालक व वाहकाचा रितसर परवाना शुभांगी हिने मिळविला. ती इतक्यावरच थांबली नाही तर तिने विविध विभागांच्या परीक्षा दिल्या. शासकीय नोकरी मिळावी म्हणून शुभांगी हिने पोलीस भरती, वनविभाग, डाक विभाग, न्यायालय आदी विभागांच्या परीक्षा दिल्या. पण त्यात पाहिजे तसे यश मिळाले नाही.

शेतजमीन गेली धरणात

गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या शुभांगी हिचा विवाह शिक्षणाचे धडे घेत असतानाच तिच्या गावानजीकच्या बोरगाव (हा.) येथील धरणग्रस्त कुटुंबातील सिद्धार्थसोबत झाला. पती सिद्धार्थची शेती धरणात गेल्यामुळे तो भूमिहीन झाला. अशा परिस्थितीतही सिद्धार्थ व शुभांगी यांनी खचून न जाता आपल्या संसाराचा गाडा ओढण्यासाठी तोकड्या मानधनावर गृहरक्षक दलात सेवा दिली.

मामांनी दिले प्रशिक्षण

– सुखी संसाराचे स्वप्न रंगविणाऱ्या शुभांगी हिने जीवनात येत असलेल्या उतार-चढावांना न जुमानता प्रथम उच्च माध्यमिक तर नंतर पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.
– शिक्षण घेत असतानाच तिला चारचाकी वाहन चालविण्याचा छंद जडला. हा छंद पूर्ण करण्यासाठी तिने मामांचे सहकार्य घेतले.
– शिवाय आपल्या मामाच्या ट्रॅक्टरवर प्रशिक्षण घेतले. तेथूनच तिचा जड वाहन चालविण्याचा प्रवास सुरू झाला. तर सध्या तिने जिल्ह्यातील पहिली महिला लालपरी चालकाचा बहूमान पटकाविला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here