
पवनार : आदरणीय साहेब, आपल्या अचानक जाण्याने पवनार गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आपल्या घरातीलच कुणी व्यक्ती निघून गेल्याची भावना प्रत्येकाच्या मनात दाटून आली आहे. साहेबांनी या गावावर, येथील प्रत्येक नागरिकावर कोणताही जाती–धर्म–पंथाचा भेद न करता निस्सीम प्रेम केले. शेकडो कुटुंबांना त्यांनी आधार दिला, पण बदल्यात कधीच काही मागितले नाही फक्त देतच राहिले. सामाजिक, राजकीय की अध्यात्मिक… प्रत्येक क्षेत्रात त्यांनी मदतीचा हात पुढे केला.
त्यांच्या दारी गेलेला कुणीही माणूस कधी रिकाम्या हाताने परतला नाही. “जेवायची वेळ असेल, तर जेवल्याशिवाय जाऊ नका” असे प्रेमाने सांगणारा हा विदर्भातील दुर्मीळ नेता होता. साहेब आमचे आधारस्तंभ, मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान होते. भागवत सोहळे असोत, स्वेटर वाटप असो, नंदी पोळा असो किंवा एखाद्या गरजू रुग्णाचे दवाखान्याचे बिल कमी करून देणे साहेबांनी प्रत्येक ठिकाणी मदत केली. ज्या शाळेत त्यांनी बालपण घालवले, त्या शाळेला नुकतीच भेट देऊन त्यांनी भरघोस मदत केली आणि भविष्यात भव्य इमारत उभारण्याच्या सूचना दिल्या.
पवनार गावावर त्यांचे विशेष प्रेम होते. गावातील पहिला सिमेंट रस्ता त्यांच्या विकास निधीतून झाला, ही बाब गावकऱ्यांसाठी अभिमानाची आहे. काल भागवत सेवा समितीच्या नाटकाचा कार्यक्रम सुरू होत असतानाच त्यांच्या निधनाची बातमी आली आणि संपूर्ण गाव क्षणात निशब्द झाले. हा धक्का पवनारवासीयांसाठी असह्य आहे. साहेब, आपली जागा कुणीही घेऊ शकणार नाही. आपण आमच्या हृदयात कायम जिवंत राहाल.
आपल्या आत्म्यास चिरशांती लाभो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना.























































