

भंडारा : पवनी तालुक्यातील अड्याळ गावालगत लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यांच्या व्हॅनला झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले. ही हृदयद्रावक घटना गुरुवारी (दि. २३ एप्रिल) रात्री सुमारे ९.४५ वाजताच्या सुमारास अड्याळजवळील सहाय्यतानगर परिसरातील महामार्गावर घडली.
अपघात इतका भीषण होता की व्हॅनचा अक्षरशः चेंदामेंदा झाला असून घटनास्थळावरील दृश्य अत्यंत विदारक होते. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ धाव घेत बचावकार्य सुरू केले. पोलिसांनीही घटनास्थळी पोहोचून मदतकार्य राबवले.
या अपघातात श्वेता पुरुषोत्तम नगरे (१७), प्रभाकर चाचरकर, मुन्नी प्रभाकर चाचरकर, नयना देवराम नगरे आणि दुर्गा देवराम नगरे यांचा मृत्यू झाला. तर चालक सोहम जागेश्वर गेडाम (२५, पिंपळगाव), नवरदेवाचा मित्र उमेश बोधनकर यांच्यासह अन्य दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अड्याळ येथील एका कुटुंबातील मुलाचे लग्न जवळच असलेल्या कोंढा येथील चर्चमध्ये पार पडले होते. लग्न सोहळा आटोपल्यानंतर वऱ्हाडी अड्याळकडे परतत होते. वऱ्हाड्यांची एक फेरी सोडून चालक दुसरी फेरी घेऊन येत असताना हा अपघात घडला.
प्राथमिक माहितीनुसार, व्हॅनचा टायर अचानक फुटल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले आणि समोरून येणाऱ्या दहा चाकी ट्रकवर जोरदार धडक बसली. या धडकेत व्हॅनचे मोठे नुकसान झाले आणि पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून लग्नाच्या आनंदावर क्षणात विरजण पडले. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
आनंदावर दु:खाचा डोंगर…
लग्नाचा आनंद साजरा करून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर अचानक आलेल्या अपघाताने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. काही तासांपूर्वीच आनंदात साजरा झालेला सोहळा क्षणात शोकसभेत बदलला. गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.




























































